मनमाड (वृत्तसंस्था) शहरापासून जवळ असलेल्या कऱ्ही गावात मोबाइल चार्जिंग करत असताना शॉर्टसर्किट होऊन झालेल्या स्फोटात भाजल्यामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहित दीपक राख (वय १९), असे मयत मुलाचे नाव आहे. पतीच्या निधनानंतर रोहितच्या आईने त्याचा तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला होता. त्यामुळे मुलाचं निधन झाल्याचं कळताच आईचा काळीज चिरणारा आक्रोश बघून अनेकांचे डोळे पाणावले होते.
नेमकं काय घडलं !
कऱ्ही (ता. नांदगाव) येथे रविवारी (दि. २९) घरात मोबाइल चार्जिंग करत असताना विजेचा शॉर्टसर्किट होऊन झालेल्या स्फोटात रोहित दीपक राख (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला असून, या घटनेने कऱ्ही गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रोहित राख हा तरुण चांदवड येथील महाविद्यालयात आयटीआयचे शिक्षण घेत होता. रोहित रविवारी सुट्टी असल्याने घरातच होता. तो मोबाइल चार्जिंगसाठी लावत असताना चार्जरचा स्फोट झाला. याचवेळी घरात शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने रोहित गंभीररीत्या भाजला. त्याला तातडीने मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात झाला होता वडिलांचा मृत्यू !
२००७ मध्ये कऱ्ही दरोडेखोरांनी दीपक भागचंद राख यांच्या डोक्यात दगडी पाटा टाकून खून केला होता. त्यावेळी रोहित अवघ्या दोन-अडीच वर्षांचा होता. तेव्हापासून रोहितच्या आईने खंबीर होऊन शेती आणि अंगणवाडीत काम केले आणि रोहितला मोठं केले होते. मुलगा १९ वर्षाचा झाल्याने आईला आता कुठं आधार जाणवायला लागला होता. पण तेवढ्यातच नियतीने घात केला आणि रोहितला कालच्या पडद्याआड नेलं. रोहितच्या आईचं दुःख बघून अनेकांचे डोळे पाणावले होते.















