जळगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे शैक्षणिक सत्राचा निकाला जाहीर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून नसतानाही जळगावातील शानबाग विद्यालयाने ऑफलाईन निकाल जाहीर केला होता. एवढेच नव्हे तर, फी अभावी काही विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर शानबाग विद्यालयाने खुलासा सादर केला होता. आता या खुलाशाविरुद्ध मुख्य तक्रारदार रवींद्र शिंदे यांनीही आपले म्हणणे लेखी स्वरूपात गट शिक्षणाधिकार्यांकडे सादर केले आहे.
तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी पत्रात म्हंटले आहे की, शानबाग विद्यालयात माझ्या पाल्याचा शैक्षणिक वर्षे २०२० – २१ या वार्षिक परिक्षेचा निकाल हा दि. ०५ मे २०२१ वार बुधवार रोजी सकाळी ९.०० वाजता जाहीर करण्यात येईल या आशयाचा मेसेज शाळेच्या गृपमध्ये व्हॉट्स अॅप वर टाकण्यात आलेला होता.
त्या अनुषंगाने दि. ०५ मे २०२१ रोजी माझ्या पाल्याचा निकाल हा मला दुपारी २.०० वाजेपर्यंत देखील प्राप्त नव्हता. त्यामुळे मी संबंधीत वर्गशिक्षक घोलाणे यांचेशी दूरध्वनी वरुन संपर्क केला असता व निकाल बाबत विचारणा केली असता त्यांनी मला सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांची फी बाकी असेल त्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांना द्यायचा नाही असे मुख्याध्यापकांनी सांगितले आहे. तरी मुख्याध्यापक यांनी मला सांगितल्यामुळे तुमच्या मुलाचा वार्षिक निकाल दिलेला नाही असे वर्गशिक्षक घोलाणे यांनी मला स्पष्ट सांगितले.
त्यानुसार मी त्यांना विचारले की, मला आता कोणाशी संपर्क साधावा लागेल असे त्यांना विचारले असता त्यांनी आपणास उपमुख्याध्यापक टेंभरे यांचेशी बोलावे लागेल. त्यानंतर मी टेंमरे यांना दूरध्वनीवरुन संपर्क करुन माझ्या पाल्याचा निकालाबाबत विचारना केली असता टेंभरे सर यांनी देखील सांगितले की, आमच्या व्यवस्थापन मंडळाने निर्णय घेतलेला आहे की, ज्या विद्यार्थ्यांची फी बाकी असेल त्यांना निकाल देण्यात येऊ नये असे त्यांनी मला सांगितले. त्यावर मी त्यांना अशा सक्ती संदर्भात व निकाल राखीव ठेवण्यासंदर्भात शासन स्तरावरुन व आपल्या शिक्षण विभागाकडून काही पत्रव्यवहार किंवा आदेश आहेत काय? याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला नाही असे उत्तर दिले.
त्यानुसार मी त्यांना माझ्या पाल्याचा निकाल राखून ठेवल्याबाबत जाब विचारला की, माझा पाल्याचा निकाल राखून ठेवल्याबाबत मला सायंकाळपर्यंत आपल्या शाळेकडून लेखी उत्तर द्या किंवा माझा पाल्याचा निकाल द्या. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, मी आपणास निकाल देतो. त्यानंतर त्यांनी वर्गशिक्षक यांना सांगितले असता वर्गशिक्षक यांनी मला व्हॉट्स अॅप वर दुपारी ३.०० वाजता निकाल दिलेला आहे.
वरील माझे सर्व म्हणणे आपण अवलोकन केल्यानंतर आपणास देखील समजले की, माझ्या पाल्याचा निकाल हा रोखूनच ठेवण्यात आला होता. कारण शाळेने पाठविलेल्या मॅसेज प्रमाणे निकाल हा सकाळी ९.०० वाजता जाहिर झालेला आहे. परंतु दुपारी ३.०० वाजेपर्यंत मी संबंधितांना जाब विचारल्या नंतरच मला दुपारी ३.०० वाजता निकाल प्राप्त झालेला आहे.
वस्तुत: संबंधित मुख्याध्यापक यांनी दिलेला खुलासा हा माझ्या वरील म्हणण्याप्रमाणे धादांत व पूर्णपणे खोटा तसेच आपल्या शिक्षण विभागाच्या नाकावर टिच्चून आपल्या विभागाला व आपण दूरध्वनी वरुन मला सांगितले प्रमाणे शासनाचे निकाल जाहीर करण्याचे कोणतेही आदेश आपल्या विभागाने दिलेले नसतांना त्यासंबंधी खुलासा सादर करतांना त्याचे स्पष्टीकरण न देता आपल्या कारणे दाखवा नोटीसीला देखील केराची टोपली दाखवून सदर खुलासा हा संबंधित वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांना संपूर्ण माहिती न विचारता दिलेला असल्याचे माझे ठाम मत आहे, किंवा संबंधित वर्गशिक्षक व उपमुख्याध्यापक हे देखील संस्थेच्या दबावापोटी खोटे बोलत आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
तरी संबंधित वर्गशिक्षक व उपमुख्याध्यापक यांचे देखील आपण लेखी स्वरुपात जाब घ्यावेत म्हणजेच मुख्याध्यापक व व्यवस्थापन मंडळाची हिटलर शाही प्रमाणे वागणूक ही जिल्ह्यातील जनतेसमोर विशेषता पालकांसमोर येईल व खुलाश्यात दिल्याप्रमाणे सदरील संस्था नेहमीच कोणत्या सामाजिक जाणिवेतून कार्य करते हे देखील स्पष्ट होईल. असे लेखी पत्रात म्हंटले आहे.
वरील सर्व बाबींचा आपण विचार करुन सदर प्रकरणी आपण सदर दोषींवर व संबंधित शाळेवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आपणा विरुध्द देखील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच शिक्षण आयुक्त पुणे यांचेकडेस देखील तक्रार करावी लागेल, असा इशारा तक्रारदार रविंद्र शिंदे यांनी लेखी पत्राद्वारे गटशिक्षणाधिकारी यांना दिला आहे .















