मुंबई (वृत्तसंस्था) राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. यात काहींनी बंगल्याच्या दिशेने चपला भिरकावल्या. तर काहींनी दगडफेक केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
थेट शरद पवारांच्या बंगल्यावर हल्लाबोल
जवळपास पाच महिने झाले तरीही शासनाने आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या अद्याप पूर्ण केल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या चोरांचे चाणक्य शरद पवार आमच्याकडे बघायला तयार नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार आहेत, अजित पवारही जबाबदार आहेत. 120 एसटी कर्मचारी शहीद झाले आहेत, अशा भावना आंदोलकांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केल्या. त्यानंतर या जमावाने थेट शरद पवारांच्या बंगल्यावर हल्लाबोल केला.
पवारांना पळता भुई थोडी होईल, संतप्त आंदोलक
जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांतच होते, जेव्हा गांधिगिरी सोडली तेव्हा मात्र आम्ही शरद पवारांना पळता भुई थोडी होईल. निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न करत या आंदोलकांनी पवारांविरोधात संतप्त व्यक्त केला. एसटी कर्मचारी संतप्त झाले अचानक पवारांच्या बंगल्यात घुसून त्यांनी पवारांच्या घरावर चपलांचा वर्षाव केला, दगडफेकही केली. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर पोलिस लगेचच घटनास्थळी पोहचले असून ते आंदोलकांना समजावत आहेत.
शरद पवार घरात, आंदोलकांचा बाहेर राडा
या सर्व गदारोळादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या आंदोलकांना सामोरे गेल्या. आंदोलकांना त्या म्हणाल्या, माझे आई-वडील घरात आहेत. त्यांची स्थिती काय आहे हे मला बघू द्या. मी दोनच मिनिटांत त्यांना बघून तुमच्याशी चर्चा करते, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केली. सुळे यांनी आंदोलकांना हात जोडून विनंती केली, त्यानंतर त्या बंगल्यात गेल्या. हा राडा सुरू होता तेव्हा शरद पवार घरात होते हे सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.
माझ्या घरावरील हल्ला दुर्दैवी – सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये ही अशी पहिलीच घटना घडली असेल. माझ्या घरावर जो हल्ला झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. पण तरीही आम्ही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहोत. या गोष्टी आंदोलन करुण किंवा चप्पल फेकून सुटणाऱ्या नाहीत, या गोष्टी केवळ चर्चेच्या माध्यमातून सुटतील. शरद पवारांच्या मुंबईतील घरासमोर घडलेल्या या घटनेनंतर सुप्रिया सुळे आंदोलकांना सामोरं गेल्या. त्या ठिकाणी त्यांनी अनेकवेळा चर्चा करु असं आवाहन आंदोलकांना केलं होतं. पण आंदोलक काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यानंतर सुप्रिया सुळे या घरामध्ये गेल्या. आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यानंतर आपल्या कुटुंबियांचे संरक्षण केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.
आता सरकारची ‘गरज सरो’ची भूमिका – आंदोलक संतप्त
कोरोनात गरज आहे असे सांगता अन् नंतर आम्ही मेलो तरी चालते, त्यापेक्षा आम्हाला सर्वांनाच संपवा, गेले पाच महिने वेळ नव्हता आता सुप्रिया सुळे कशा आल्या, असा सवालही आंदोलकांनी केला आहे. आमचे कष्ट बघा, घाम बघा आम्हाला काहीही मोबदला दिला नाही. सत्य परिस्थिती तुम्ही जाणून घ्या. आमचे सहकारी आम्ही गमावले या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार व महाविकास आघाडी जबाबदार आहे, त्यांनी अद्यापही न्याय दिला नाही, अशा संतप्त भावना आंदोलकांनी केल्या आहेत.
राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक
एसटी कर्मचाऱ्यांचा हा गोंधळ सुरू असतानाच दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आले. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी म्हटले की, आमच्या नेत्यांनी फक्त विलिनीकरणाचा मुद्दा सोडून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सदावर्ते आणि त्यांच्या बगलबच्चांनी ठरवून हा हल्ला केला. आम्ही सडेतोड उत्तर देऊ. फक्त आमच्या नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, अशा संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.