मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीतील निकालात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. त्यातच अजित पवारांचे १९ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी राजकीय खळबळ उडवून दिली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याच बरोबर त्यांच्या गटातील १२ आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. हे आमदार काय करतील हे पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल. पण या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही, हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील.
आमचे शरद पवार यांना एकच सांगणे आहे की, पक्षाच्या अडचणीच्या काळात जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिले, त्यांनाच पहिले प्राधान्य द्यायला हवे. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना तसेच ज्यांना भाजपने मारून-मुटकून अडचणीत आणून तिकडे नेले असेल त्यांना दुसरे प्राधान्य द्यावे असे सर्व कार्यकर्त्यांना वाटते, असे रोहित पवार म्हणाले.
युगेंद्र पवार यांना आगामी बारामती विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाणार का? या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाचे तिकीट नाकारायचे याचा निर्णय शरद पवार घेतात, त्यामुळे हा प्रश्न शरद पवारांना विचारावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते बाळासाहेब पाटील, जयंत पाटील आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे आमचे शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील, असे रोहित पवार यांनी सांगितले.