जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीला स्वतः च्या ५४ जागांसह कॉंग्रेसच्याही जागा मिळणार आहेत. तसेच राष्ट्रवादीला 90 जागा लढवेल आणि 71 हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावा अजित पवारांनी त्यांच्या भाषणात बुधवारी केला होता. अजित पवार यांच्या दाव्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी गोची झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण आगामी काळात कसं असेल हेच आपण समजून घेणार आहोत.
राष्ट्रवादी राज्यातील 90 जागा लढवण्याचा दावा !
बुधवारी झालेल्या सभेमध्ये अजित पवार म्हणाले की, या पुढच्या निवडणुका या घडाळ्याच्या चिन्हावर लढल्या जातील आणि राष्ट्रवादी राज्यातील 90 जागा लढवेल. त्यापैकी 71 हून अधिक जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. राज्यात विधानसभेच्या 288 जागांपैकी जर अजित पवार यांची राष्ट्रवादी 90 जागा लढवणार असेल तर उरलेल्या 198 जागांमध्ये भाजप आणि शिवसेनेला जागावाटप करावं लागेल. त्यापैकी भाजपने किमान 150 जागा लढवल्या तर शिंदे गटाकडे केवळ 48 जागा उरतील. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल्याप्रमाणे शिंदे गटाला 48 जागाच दिल्या जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील विधानसभा निहाय समीकरण !
जळगाव जिल्ह्यातील मतदार संघनिहाय गणित समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अजित पवार यांच्या गटाकडे आज फक्त अमळनेरची एकच जागा आहे. याच मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना नुकतीच मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे ही जागा अजित पवार यांच्या गटाला सोडण्यास महायुतीतील घटक पक्षांना फार अडचण येणार नाही. परंतू येथील माजी आमदार तथा कधीकाळी अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे साहेबराव पाटील यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाहीय. त्यामुळे अजित पवार गटाची याठिकाणी कसोटी लागण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसच्याही जागा आपल्याला मिळणार, या अजित पवार यांच्या दाव्यानुसार जळगाव जिल्ह्यात फक्त अशी एकच जागा आहे आणि ती म्हणजे रावेर विधानसभा मतदार संघ होय.
रावेरचा दावा भाजप सोडणे कठीण !
रावेरमध्ये कॉंग्रेसचे शिरीष चौधरी हे विद्यमान आमदार आहेत. परंतू या जागेवर भाजपचा देखील भक्कम दावा आहे. कारण स्व. हरिभाऊ जावळे यांची या मतदार संघावर चांगली पकड होती. त्यांच्या निधनानंतर स्व. हरिभाऊ यांचे चिरंजीव अमोल जावळे यांनी जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. थोडक्यात रावेरमधून निवडणूक लढण्याच्या दृष्टीने त्यांनी चांगली तयारी केलेली आहे. त्यामुळे रावेरची जागा कॉंग्रेसकडे असूनही ती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळेल का?, हे आताच सांगणं कठीण आहे. परंतू ही जागा भाजप कोणत्याही परिस्थितीत सोडण्याच्या मानसिकतेत नसल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिलीय. जर भाजपने ही जागा दिली नाही तर मात्र, अजित पवार गटाला जिल्ह्यात अवघ्या एका जागेवरच समाधान मानावे लागणार आहे.
जिल्ह्यातील माजी आमदारांचा ओढा शरद पवारांकडे !
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बहुतांश माजी आमदार यांचा ओढा शरद पवारांकडेच आहे. विधानसभा निहाय बघितले तर चोपडा विधानसभा मतदार संघात लताबाई चंद्रकांत सोनवणे ह्या शिंदे गटाच्या विद्यमान आमदार आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे जगदीश वळवी हे माजी आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
भुसावळ मतदार संघ एससी संवर्गासाठी राखीव असून या मतदार संघात भाजपचे संजय सावकारे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हा मतदार संघ देखील अजित पवार गटाला सुटणे शक्य नाहीय. येथील माजी आमदार संतोष चौधरी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. जळगाव शहर मतदार संघात भाजपचे राजूमामा भोळे, जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे नेते तथा विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील हे आमदार आहेत. येथील माजी पालकमंत्री तथा माजी आमदार गुलाबराव देवकर हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.
एरंडोल मतदार संघात शिवसेनेचे चिमणराव पाटील हे आमदार आहेत. येथील माजी पालकमंत्री तथा माजी आमदार डॉ. सतीश पाटील हे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा देखील भाजपकडे कायम राहील. पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्याकडे या मतदार संघाची धुरा आहे. येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ हे देखील शरद पवार यांच्यासोबत आहेत.
राज्याचे विद्यमान मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचा जामनेर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाहीय. तर मुक्ताईनगरमध्ये शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील हे आमदार आहेत. येथील राष्ट्रवादीचे विधानपरिषदचे आमदार एकनाथराव खडसे यांनी आपण पवार साहेबांसोबत असल्याचे जाहीर केले आहे.
थोडक्यात मतदार संघ निहाय स्थिती !
जळगाव, रावेर, भुसावळ, चाळीसगाव, जामनेर या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तर रावेरमध्ये कॉंग्रेस आणि अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर शिंदे गटाच्या ताब्यात चोपडा, जळगाव ग्रामीण, एरंडोल पाचोरा हे मतदार संघ आहेत. तर मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील अपक्ष असून ते शिंदे गटासोबत आहेत.
थोडक्यात अजित पवार यांच्यासोबत गेल्यास जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना विधानसभेला उमेदवारी मिळण्याची धूसर देखील शक्यता नाहीय. त्यामुळेच माजी आमदारांचा ओढा शरद पवार यांच्याकडे आहे. दुसरीकडे लोकसभेचा विचार केला तर जिल्ह्यात रावेर आणि जळगाव हे दोन लोकसभेचे मतदार संघ आहेत. परंतू या दोघंही मतदारसंघावर भाजपची जबरदस्त पकड असून भाजपचे गड मानले जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही अजित पवार यांच्या गटाच्या हाती काहीच लागणार नसल्याचे स्पष्ट आहे.