बारामती (वृत्तसंस्था) पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. मात्र, दिवाळी पाडव्यानिमित्त कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती. मात्र खुद्द शरद पवारांनीच अजित दादांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिलं. अजित पवारांच्या ड्रायव्हरला कोरोना झाल्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असं पवार यांनी सांगितलं.
प्रथा परंपरेनुसार बारामतीच्या गोविंदबागेत प्रत्ये वर्षी पवार कुटुंबिय हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतात. दिवाळी पाडव्याच्या संपूर्ण दिवशी हा कार्यक्रम रंगतो. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित असतात. तर राज्यभरातून विविध नेते, खासदार-आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते गोविंदबागेकडे कूच करत असतात. एकंदरितच या कार्यक्रमाची आठवडाभर अगोदरच तयारी सुरु असते. प्रत्येक वर्षी हा अजितदादांच्या अचूक नियोजनाखाली पार पडतो. पण या वर्षी तेच कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. याच चर्चांवर शरद पवार यांनी खुलासा केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ड्रायव्हरला कोरोना झाल्याने अजितदादांनी आजच्या कार्यक्रमाला येणं टाळलं. ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्यानंतर अजितदादांनीही कोरोना टेस्ट केलीय. त्यांचा कोरोना अहवाल येणं अद्याप बाकी आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दोन चालक आणि तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आलेत. त्यांच्याही टेस्ट केल्या गेल्या आहेत. त्यांनीही कोरोनाची शक्यता वर्तवली आहे. आज इतके सारे लोक येणार, भेटीगाठी घेणार, उगीच धोका नको म्हणून ते आज कार्यक्रमाला आले नाहीत, असं पवारांनी सांगितलं. शरद पवार यांनी आज दिवाळी निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. गोविंद बागेतली त्यांच्या घरी कार्यकर्त्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर पवारांनी मीडियाशी संवाद साधला.