अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील अंमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य आरोपी नंदू बेलदार याला आज अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, अंमली पदार्थ तस्करीमधील आरोपी नंदु उर्फ नंदलाल रतन बेलदार (मोहीते) (रा. वनकोठा ता. एरडोल जि. जळगाव) हा मागील १० महिन्यापासुन अमळनेर पोलीस स्टेशनच्या ७५ किलो गांजा कार्यवाहीच्या गुन्ह्यात फरार होता. तो बाहेर राज्यात व महाराष्ट्रातील काही जिल्हात अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहीती पोलीस यंत्रणेला यापुर्वी मिळाली होती. त्या संबंधाने नंदु उर्फ नंदलाल रतन बेलदार (मोहीते) त्याला पकडण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी अमळनेर व कासोदा पोलीसांना दिले होते.
१८ डिसेंबर रोजी नंदू बेलदार हा आरोपी हा वनकोठा कासोदा या भागात आला आहे, अशी गोपनीय माहीती अमळनेर पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक जयपाल हिरे, पोऊनि शत्रुघ्न पाटील, पोहेकॉ किशोर पाटील, पोहेकॉ सुनिल हटकर, पोना मिलिन्द भामरे, पोकों राहुल पाटील, अमोल पाटील, सुर्यकांत सांळुके, अतुल मोरे अशा पथकाने नंदु उर्फ नंदलाल रतन बेलदार (मोहीते) यांचेवर लक्ष ठेवून रात्री १० वाजेच्या सुमारास कासोदा पोलीसांची वेळेवर मदत घेवुन ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला १९ डिसेंबरला कोर्टात हजर केले असता २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानुसार अमळनेर पोलिस नंदूला सबजेलाला घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
















