अमळनेर (प्रतिनिधी) दरोड्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीला मुक्त करण्यासाठी लागणारा पैसा उभारण्यासाठीच दरोडा टाकणार असल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींनी अमळनेर पोलिसांना दिली आहे.
पोलिसांना रात्री गस्तीदरम्यान दुचाकीवर चिखल लावलेल्या नंबरप्लेटसह पाच ते सहा जण ११ एप्रिल रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास आढळून आले होते. पोलिसांना पाहताच यातील अनेकांनी पळ काढला, मात्र पिंपळकोठा येथील जगदीश पुंडलिक पाटील (वय २२) याला पकडण्यात पोलिसांना यश आले. जगदीश याच्यावर अमळनेर, पारोळा, एरंडोल, सांगवी (ता. शिरपूर), मारवड, जिल्हा पेठ आदी पोलिस ठाण्यात चोरी, दरोड़ा, सरकारी कामात अडथळा असे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला भेटणाऱ्या व्यक्ती तथा मित्रांच्या संशयित हालचाली पाहता काहितरी गंभीर प्रकार असल्याचा पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना संशय आला. आरोपीला पोलिस कोठडी मिळताच पोलिसांनी त्याला खाक्या दाखवून इतर सहकारी आरोपींची माहिती विचारली. त्यावेळी पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली.
सराईत गुन्हेगार सागर संजय पाटील यांचा चुलत भाऊ भटू पाटील याच्याविरुद्ध असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातून त्याला सोडवण्यासाठी पैशांची व्यवस्था करायची होती. त्यामुळे दिनेश भोई, प्रेम पाटील, अजय अंबे, करडाणे यांना घेऊन दरोड्याची तयारी केली होती, असे कळले. त्यानंतर पोलिसांनी दिनेश पिंटू सोनवणे, प्रवीण रवींद्र पाटील (रा. पिंपळकोठा, ता. पारोळा) व शिवाजीनगर पैलाडमधील भटू उर्फ अमोल मधुकर पाटील (गांगुर्डे) यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
















