मुंबई (वृत्तसंस्था) : प्रताप सरनाईकांसह काही नेत्यांना गेल्या काही दिवसांत क्लिनचिट देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. याचविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. माझा अमित शाहांवर विश्वास आहे, ते मला नक्की न्याय देतील, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. शिवाय भाजपाने सरनाईक कुटुंबाची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही केली आहे.
सुप्रिया सुळे पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. बंडानंतर शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास बंद करण्याचा अहवाल स्विकारण्यात आला आहे. त्यावरुन सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. सुळे म्हणाल्या की, आधीचा आरोप खोटा होता असं म्हणावं लागेल. असं असेल तर तुम्ही त्यांची बदनामी केली म्हणून त्यांच्या कुटुंबाची आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. जर त्यांनी चूक केली असेल तर क्लिनचिट कशी देत आहात? भाजपाने दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा.
याबद्दलच पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, अमितभाई शाह यांच्यावर माझा खूप विश्वास आहे. एक महिला खासदार म्हणून शाह मला नक्कीच न्याय देतील, असा विश्वास आहे. अमित शाह खरं बोलतात, याचा अनुभव मला अनेकदा आला आहे. मी संसदेत हा विषय माहितीच्या आधारे मांडणार आहे. मला सीबीआयचा वापर कसा करतात, याचं जनरल नॉलेज नाही. ईडी वगैरे काय असतं हे मला माहित नव्हतं. आता ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले, त्या सगळ्याची क्रोनोलॉजी पाहा.
















