पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील आवें शिवारात शेतातील वाहिवाट रस्त्याच्या वादातून एकाला खड्यात ढकलून देत अंगावर माती लोटून जिवंत खड्डयात पुरण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मंगळवारी १४ मार्च रोजी रात्री उशिरा पाच जणांविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मानसिंग प्रतापसिंग शिख (वय ४०, रा. गिरणा गॅस गोदामाजवळ पाचोरा) हे शेती आणि वकीली व्यवसाय करतात. त्यांचे पाचोरा तालुक्यातील आवें शिवारात शेत आहे. शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्त्याचा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. १२ मार्चला दुपारी ४ वाजता वहिवाटीच्या रस्त्यात जेसीबीने खोदकाम सुरू केल्याचे मानसिंग यांना दिसून आले.
याबाबत चंद्रकांत श्रीराम शर्मा आणि अरुण चंद्रकांत शर्मा यांना विरोध केला असता त्यांनी मानसिंग यांना खड्डयात ढकलून दिले. तसेच जेसीबीने त्यांच्या अंगावर माती टाकण्यास सुरुवात केली. हा प्रकार घडत असताना मानसिंग यांच्या भावाने धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. नंतर मंगेश सुखदेव चंदनशिव, देविदास धनराज पाटील आणि जेसीबीचे चालक दीपक धनगर यांनी मानसिंग यांना मारहाण केली. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.