पारोळा (प्रतिनिधी) नैसर्गिक विधीसाठी नदीकाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार करून दगडाने तिच्या डोक्यावर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली.
जिल्ह्यातील एरंडोल व भडगाव तालुक्यातील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पारोळा तालुक्यात एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीला धुळे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली. पोलिसांकडून ग्रामस्थांची समजूत काढून आरोपीला अटक केली. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी समजूत काढल्यानंतर जमाव शांत झाला. पारोळा तालुक्यात एका गावात १० रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर गावातील बारक्या उर्फ अशोक मंगा भील (वय १९) याने बळजबरी लैंगिक अत्याचार केला. त्याला विरोध केला असता त्याने मुलीच्या डोक्यावर दगड मारून व दोरीने गळा आवळून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत काही वेळानंतर जखमी अवस्थेत मुलगी घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीला धुळे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अमानवीय घटनेच्या अनुषंगाने आ. चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन, दोषीवर तत्काळ कार्यवाही करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. या वेळी आ. चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सूचना दिल्या. तर बालिकेच्या आईची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत नियमानुसार सर्वोतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन दिले.
वरिष्ठाशी संपर्क करुन गुन्हेगारावर कठोर कारवाई करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी या वेळी केली. या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करुण पीडित मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी केली. तसेच पीडित मुलीच्या आईची भेट घेवून या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासित केले.