यवतमाळ (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर येथे मध्यरात्री एकाने आपल्या सासरच्या लोकांवर मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला चढवत चौघांचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पत्नीच्या चारित्र्यावर संशयाने जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी,दोन मेहुणे आणि सासऱ्याचा निर्घृण खून केला. या घटनेत एकाच कुटुंबतील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सासू गंभीर जखमी आहे. गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे. पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसाळे, मेहुणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले यांचा मृत्यू झाला आहे.
कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्या येथे पती – पत्नी राहत होते. चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत असल्याचे वृत्त आहे. पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय गोविंद याला होता. त्यावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. या कारणावरून गोविंद पत्नी रेखाला नेहमी मारहाण करत होता. त्यामुळे कंटाळून ती गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहायला आली होती. यामुळे गोविंदचे पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत सतत वाद सुरू होते. या वादातूनच हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला. तेव्हा संतापलेल्या जावायाने शस्त्राच्या सहाय्याने पत्नी रेखा, सासरा पंडित, सासू रूखमा व मेव्हणे ज्ञानेश्वर आणि सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. वार थेट छातीवर करण्यात झाल्यामुळे पत्नी रेखा पवार, सासरा पंडित घोसले, मेव्हणा ज्ञानेश्वर घोसले व सुनील घोसले हे जागीच ठार झाले. तर सासू रूखमा घोसले ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.