जामनेर (प्रतिनिधी) मॉर्निंग वॉक करून घराकडे परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे शहरातील गणपती नगरच्या कॉर्नरजवळ पावणेपाच वाजेदरम्यान घडली. वसंत सैतवाल,असे मयत वृद्धाचे नाव आहे.
वसंत सैतवाल हे मंगळवारी पहाटे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. अचानक पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सैतवाल यांच्या डोक्याला समोरील बाजूस जबर लागला. त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही पायांवरून चाक गेल्याने सैतवाल गंभीर जखमी झाले. मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. यापैकी एका व्यक्तीने हे तर डॉ. स्वप्नील सैतवाल यांचे वडील असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. सैतवाल यांना फोन करून घटना कळविण्यात आली. डॉ. सैतवाल यांनी काही मित्रांसह तात्काळ घटनास्थळ गाठले. जखमी वडिलांना डॉ. सैतवाल यांनी रुग्णालयात दाखल केले. परंतू तोपर्यंत मात्र, खूप उशीर झालेला होता. डॉक्टरांनी वसंत सैतवाल यांना मृत घोषीत केले. मृत वसंत सैतवाल हे जे.डी.सी.सी. बँकेत कॅशियर म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.