मुंबई (वृत्तसंस्था) सोमवारी संध्याकाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रश्नांना उत्तरं देत असताना अचानक फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक खेचला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेच अवाक झाले. आता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान, एकनाथ शिंदेंना संतोष बांगर हे कोणत्या पक्षातून तुमच्या पक्षात आले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाने एकनाथ शिंदे गोंधळले. काय उत्तर द्यावं हे त्यांना कळेना, कुठल्या पक्षामधून काय, ते शिवसेनेतून आलेत ना, असं ते म्हणाले. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोरून माईक खेचला आणि सूत्रे आपपल्या हाती घेतली. संतोष बांगर हे शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेतून आले, आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते, असं हजरजबाबी उत्तर फडणवीसांनी दिलं. एवढं बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माईक पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे दिला. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी चातुर्याने शिंदेंना कठीण प्रश्नातून सोडवलं तरी यापुढे या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी वरचष्मा हा फडणवीसांचा राहील, असे संकेत यानिमित्ताने बघायला मिळाले.