मुंबई (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका युवतीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. १४ सप्टेंबर रोजी येथे एका १९ वर्षीय दलित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला होता. आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही योगींवर निशाणा साधला आहे.
सदर दलित युवती शेतात गेली असताना चार उच्चजातीय युवकांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत तिला आधी अलीगढ येथे आणि नंतर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जिथे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध क्षेत्रांमधून तिला न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेची तुलना निर्भया प्रकरणाशीही केली जात आहे आणि हैदराबादप्रमाणेच इथेही तत्काळ न्याय होण्याची मागणी केली जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटले आहे, ‘गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इतरांना सल्ले देताना दिसत होते. मी त्यांना सल्ला देतो की त्यांनी त्यांच्या राज्याची काळजी करावी आणि तिथल्या जंगलराजवर कडक कारवाई करावी.’
पीडित युवतीच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेश पोलिसांवरही आरोप केला आहे की त्यांनी वेळीच या प्रकरणी योग्य ती कारवाई केली नाही. हे प्रकरण उजेडात आल्यानंतरही त्यांनी सदर मुलीवर बलात्कार झाल्याच्या माहितीचे खंडन केले होते. तसेच तिची जीभ कापली गेली नसल्याचे आणि तिच्या पाठीचा कणा मोडला नसल्याचे सांगितले होते. पीडितेच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध रात्री उशिरा पोलिसांनी तिच्यावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोपही तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर देशभरातून सरकार आणि पोलिसांवर टीकेची झोड उठत आहे.