जळगाव (प्रातिनिधी) लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. जनावरांचे लसीकरण करणे ही महत्त्वाची उपाययोजना आहे. त्यामुळे यंत्रणांनी लसीकरणाला प्राधान्य देत लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकांचीही मदत घ्यावी असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
लम्पि चर्मरोग या जनावरांमधील संसर्गजन्य आजारासंदर्भात पशुसंवर्धन मंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीपूर्वी त्यांनी मस्कावद, खिरोदा, फैजपूर येथे पशुंची पाहणी करून पशुपालकांशी संवाद साधला.
या बैठकीस खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. व्ही. शिसोदे आदी उपस्थित होते.
श्री. विखे पाटील म्हणाले की, या रोगामुळे जनावरांचा मृत्यू होऊ नये म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मृत जनावरांच्या पशुपालकास प्रत्येकी 10 हजारांची मदत शासन करणार आहे. बाधीत जनावरांचा उपचार व अबाधित जनावरांचे लसीकरण शासनातर्फे मोफत करण्यात येत आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व पशुचिकित्सालयांमध्ये प्रतिबंधात्मक औषधांचा व अन्य औषधोपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा पुरेसा असल्याची खात्री करावी. लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय युद्धपातळीवर राबविणे आवश्यक असून त्यासाठी शासकीय पशुवैद्यकांना मदतीसाठी खाजगी पशुवैद्यकांनी मदत करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व खाजगी पशुवैद्यकांच्या सेवा घ्याव्या. सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनातल्या यंत्रणा आणि पशुपालक शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण या संसर्गजन्य आजाराच्या साथीतून आपले पशुधन सुरक्षित ठेवू, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या व अशा अन्य साथीच्या आजारांसाठी पशुविज्ञान विद्यापीठ व पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्त पणे उपाययोजना राबवाव्या. राज्य शासनाच्या प्रयोगशाळांचा आणि विद्यापीठांतील प्रयोगशाळांचा समन्वय साधून त्या योगे अधिक संशोधन करावे व पशुधनाला सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या, संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आली आहे, अशी माहिती श्री विखे पाटील यांनी दिली.
या बैठकीत उपस्थित खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे,यांनीही महत्वाच्या सुचना केल्या. त्यात पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकांची रिक्तपदे भरणे,लसीकरणासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे, जनावर दगावल्यास शेतकऱ्यास मदत मिळवून देणे, जनावरांसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा आदी मुद्यांचा समावेश होता.
जिल्ह्यातील नियंत्रण उपाय योजना
1 बाधित पशुधनावर नियमित औषध उपचार
2 सावदा व रावेर येथील जनावरांचे बाजार तात्काळ बंद
3 जिल्हा नियोजन समितीकडून लस खरेदीसाठी 5 लाख एवढा निधी तात्काळ उपलब्ध
4 रिंग पध्दतीने 90 हजार 163 जनावरांचे लसीकरण पूर्ण
5 जिल्ह्यातील जनावरांचे सर्व बाजार बद
6. आंतरराज्यीय जनावरांची वाहतूक बंद
जिल्ह्यातील सद्यस्थिती-
1 जिल्ह्यातील एकूण पशुधन 8 लाख 46 हजार 407 (गाय वर्ग 577302, म्हैस वर्ग 269105)
2. आठ तालुक्यांत 29 बाधित क्षेत्र
3. 90 हजार 163 पशूधन लसीकरण करण्यात आले (उद्दिष्ट्य 1 लाख 6245 )
4. जिल्ह्यात एकूण बाधित पशूधन – 392
5. एकूण बरे झालेले पशूधन- 242
6. सद्यस्थितीत आजारी- 138
7. एकूण मृत्यू- 12