मुंबई (वृत्तसंस्था) लोअर परळ रेल्वे स्थानकावर दोन दिवसांपूर्वी घडलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका महिलेकडे पाहून एका तरूणाने अश्लील हावभाव केल्याची घटना घडली आहे. या आरोपी तरुणाने या महिलेला आपला प्रायव्हेट पार्ट दाखवत त्याने अश्लील चाळे केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शमशाद मुमताज अन्सारी असे आरोपीचे नाव आहे.
मुंबई सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला दररोज लोअर परेल ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करते. गेल्या ८ ते १० दिवसांपासून संबंधित तरुण तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. सोमवारी सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांच्या सुमारास पीडित महिला तिच्या भावासोबत लोअर परेल रेल्वे स्टेशनवर आली होती. त्यावेळीही आरोपीने असेच कृत्य केले.
पीडिता आणि भावाकडून आरोपीचा पाठलाग
त्यानंतर महिलेच्या भावाने आरोपी अन्सारीला जाब विचारला, तेव्हा त्याने तिच्या भावाला ढकलून पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे जीआरपी अधिकाऱ्याने सांगितले. पीडित तरुणी आणि तिच्या भावाने आरोपीचा पाठलाग करत त्याची धरपकड करण्यात यश मिळवले आणि त्याला स्टेशनवर असलेल्या रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर मुंबई सेंट्रल जीआरपी पोलिस ठाण्यात आणून आरोपी शमशाद मुमताज अन्सारीला अटक करण्यात आली. प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या पोलिसांनी अन्सारीला मुंबई सेंट्रल जीआरपी पोलिस ठाण्यात आणले आणि महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.