मुंबई (वृत्तसंस्था) पत्नीच्या कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून पतीने आणि त्याच्या मित्राने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने वाढदिवसाची पार्टीसाठी जायचे असल्याचे सांगून पत्नीला मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी पीडित महिलेला कोल्डड्रिंक प्यायला दिले. कोल्डड्रिंक पिल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर काही तासांनी शुद्धीवर आली. त्यावेळी महिलेच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त झाले होते. त्यावेळी तिच्यासोबत घडलेला प्रकार लक्षात आला. यानंतर पीडितेने आपल्या पतीला जाब विचारला. त्यावेळी त्याने या प्रकरणाची कुठेही वाच्चता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
यानंतर घरी आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. तसेच महिलेने तिच्या सोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या घरच्यांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी (२७ नोव्हेंबर) अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंबोली पोलीस पुढील तपास करीत आहेत.