जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक देण्याबाबतचे संदेश समाजमांध्यमावर फिरत आहेत. मात्र हा काही समाजकंटकाडून अनाथ बालकांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्या बालकांची विक्री करण्याचे गंभीर प्रकार आहे. त्यावर कायद्यानुसार कठोर कार्यवाही केली जाईल, असा इशारा महिला व बाल विकास विभागाने दिला आहे. अशा घटना रोखण्यासाठी याबाबतची माहिती मिळाल्यास चाईल्ड लाईन-१०९८ या हेल्पलाईनशी संपर्क साधावा, अथवा सारा (State Adoption Resource Agency) ८३२९०४१५३१ या क्रमांकावर माहिती द्यावी. असे आवाहन विजयसिंग परदेशी, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये केले आहे.
कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्येसोबतच कोवीड-१९ मुळे दोन्ही पालकांचा मृत्यु झाला असल्यास बालके अनाथ होण्याची गंभीर समस्या होत आहे. अशा बालकांच्या समस्येचा काही सकाजकंटक संधी म्हणुन वापर करुन घेत विक्री करत असल्याचे चित्र समाज माध्यमावरील पोस्टवरुन दिसून येत आहे. यासाठी फेसबुक, व्हास्टॲप, इन्टाग्राम, टिव्टर चा वापर करुन त्यावर विविध भावनात्मक मेसेज टाकले जात असुन बालके दत्तकास उपलब्ध आहेत असे चित्र निर्माण केले जात आहेत. हे समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकरता येत नाही. परंतु अशाप्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे, देणे व खरेदी विक्री करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड साहितानुसार कठोर कार्यवाहीस पात्र आहे.
७ मे, २०२१ शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्कफोर्स / कृतीदल स्थापन करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहे. या टास्कफोर्स / कृतीदलामध्ये सदस्य म्हणून आयुक्त, महानगरपालिका, पोलिस अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणुन काम पाहणार असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव राहतील, असेही परदेशी यांनी कळविले आहे.