जळगाव (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगावमार्फत युवकांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेव्दारा प्रतिवर्षी उपलब्ध करुन दिली जात आहे.
यावर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालयामार्फत युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक २४ ते २५ डिसेंबर, २०२० रोजी ऑनलाईन/व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे. या युवा महोत्सवामध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभाग घेवु शकणारी आहे. इच्छुक युवक व युवतीनी आपली प्रवेशिका २३ डिसेंबर, २०२० पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे जमा करावी. प्रवेशीकेसोबत जन्मतारखेचा पुरावा, जिल्ह्यातील रहिवासी असल्याबाबतचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
युवा महोत्सवाचे नियम व अटी
लोकनृत्यासाठी कलाकारांची संख्या २० असून कार्यक्रम सादर करण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ असेल. स्टेज व्यवस्थेसाठी अधिकचे ५ मिनीट मिळतील तर लोकगीतांसाठी कलाकारांची संख्या 6 असून कार्यक्रम सादरीकरणासाठी ७ मिनिटे वेळ असेल स्टेज व्यवस्थेसाठी अधिकचे ४ मिनीट मिळतील. एकांकीकाकरीता (इंग्रजी किंवा हिंदी) कलाकारांची संख्या १२ असून कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी ४५ मिनीटांचा वेळ मिळणार असून स्टेज व्यवस्थेसाठी अधिकचे १० मिनीट मिळतील. तर शास्त्रीय गायनासाठी (हिंदुस्थानी) कलाकारांची संख्या १ असेल तर कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी १५ मिनीटांचा वेळ मिळेल व स्टेज व्यवस्थेसाठी अधिकचे ५ मिनीट मिळतील. शास्त्रीय वाद्य प्रकारात सितार, बासरी व विणा या वाद्यांसाठी १५ मिनीटांचा वेळ असेल तर स्टेज व्यवस्थेसाठी अधिकचे ५ मिनीट मिळणार आहे. तर तबला, मृदुंग, हार्मोनिअम (लाईट) गिटार या वाद्यांसाठी १० मिनिटांचा वेळ मिळणार असून स्टेज व्यवस्थेसाठी अधिकचे ५ मिनीट मिळतील. शास्त्रीय नृत्य प्रकारात मणिपूरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी प्रकारासाठी १५ मिनीटांचा वेळ मिळणार असून स्टेज व्यवस्थेसाठी अधिकचे ५ मिनीट मिळतील. तसेच वक्तृत्व स्पर्धेकरीता (इंग्रजी किंवा हिंदी) ४ मिनीटांचा वेळ मिळणार असून स्टेज व्यवस्थेसाठी अधिकचे ५ मिनीट मिळणार आहे.
युवा महोत्सव आयोजनाबाबत महत्वाच्या सूचना, नियम व अटी
कलाकराचे वय १२ जानेवारी, २०२० पर्यत १५ वर्ष पूर्ण तर २९ वर्षा आतील असावे. कलाकारांचा जन्म हा १२ जानेवारी, २००५ पुर्वी व १२ जानेवारी, १९९१ नंतरचा असणे आवश्यक आहे. सोबत जन्मतारखेचा दाखला/शाळा, महाविद्यालय सोडल्याचा दाखला/बोर्ड प्रमाणपत्र व जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचा दाखला (डोमासाईल प्रमाणपत्र) याची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. प्रत्येक कलाकाराकडे त्यांना आवश्यक असणारे कॅश्चयुम, ड्रेस, इंस्टुमेंटस, प्रॉप्स, मेकअप, इत्यादी साहित्य स्वत:चे असावे, आयोजकांकडुन कोणतेही साहित्य अथवा वाद्य पुरविले जाणार नाही. कला सादर करतांना कुठल्याही प्रकारची इजा, दुखापत अथवा गंभीर अपघात झाल्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. याची सर्व जबाबदारी संबंधित कलाकार व संघव्यवस्थापक यांची राहील. इलेट्रॉनिक्स वाद्य उदा. सिथेसाईझर इ. स्पर्धात्मक प्रकारामध्ये वापरण्यास परवानगी नाही. लोकनृत्यासाठी टेप अथवा कॅसेट, लोकगीतासाठी फिल्मीगीत, शास्त्रीय गायनामध्ये सिनेगीतासाठी परवानगी दिली जाणार नाही. शास्त्रीय नृत्य (मणिपूरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी) सादर करणाऱ्या कलाकारांनी पुर्वमुद्रीत ध्वनीफितीवर (कॅसेट, सी.डी) कार्यक्रम सादर करता येईल. मात्र त्याचा कार्यक्रमाच्या दर्जावर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी संयोजकावर रहाणार नाही. वक्तृत्व स्पर्धेसाठी (उत्स्फुर्त वक्तृत्व) चिठ्ठी काढुन जो विषय मिळेल त्या विषयावर बोलणे आवश्यक आहे.
युवा महोत्सव कालावधीत कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास तक्रार निवारण समितीचा निर्णय अंतिम राहिल. प्रतिस्पर्धी कलाकाराबाबत काही आक्षेप असल्यास योग्य त्या पुराव्यासह रु. ५००/- भरुन त्याचठिकाणी आक्षेप सिध्द करावा लागेल. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक राहिल. त्याबाबत कोणताही तोंडी अथवा लेखी आक्षेप स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. युवा महोत्सवातील संख्या ही साथसंगत देणाऱ्यासह असल्यामुळे वेगळी साथसंगत घेता येणार नाही. कलाकार व सहकलाकार/साथसंगत देणारे, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, सुध्दा १५ वर्ष पूर्ण व २९ वर्षाआतील वयोगटातील असावा. जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त संघ/सपर्धेक विभागीय युवा महोत्सव स्पर्धेत सहभागी होईल. स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन (Online) असल्यामुळे स्पर्धा कालावधीत लिंक पाठविण्यात येईल. स्पर्धकांनी मायक्रोफोन/व्हिडीओ कॉल इत्यादी सुविधेसह आपल्या घरातून किंवा उपलब्ध हॉलमधून सहभागी व्हावयाचे आहे. आपला प्रवेश अर्ज विहित नमुन्यात सादर करावा. युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकार, युवक व युवती यांनी अधिक माहितीसाठी सुजाता गुल्हाने, क्रीडा अधिकारी मोबाईल नंबर ९७६३२३११४६ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन मिलिंद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.