जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे काही अधिकारी व कर्मचारी कोविड -१९ विषाणूमुळे बाधित झालेले असल्यामुळे करोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून या कार्यालयाचे दिनांक १ मार्च, २०२१ रोजीचे परिपत्रकान्वये शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारे अभ्यांगतांची अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषगाने नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे त्यांचे कामासाठी अर्ज/निवेदने दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात न येता शक्यतो त्यांनी त्यांचे अर्ज/निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित शाखेच्या शासकीय ई–मेलवर सादर करावेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणारे सर्व टपाल हे केवळ सामान्य शाखा येथेच स्वीकारले जाईल. कोणतीही व्यक्ती/नागरीक टपाल देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही शाखेत/विभागात प्रत्यक्ष प्रवेश करणार नाही. केवळ अत्यंत तातडीच्या/महत्वाच्या विषयाबाबत अभ्यागतांना संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशव्दारावर थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत संपर्क साधून त्यांचे कामाच्या विषयाबाबत संबंधित विभाग प्रमुखांमार्फत पुढील कार्यवाही करता येईल.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबतचे निवेदन सादर करण्यासाठी येणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वीय सहाय्यक, जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून पूर्व निर्धारित वेळ घेवून केवळ ५ व्यक्तींनाच निवेदन सादर करता येईल. केवळ अत्यावश्यक/तातडीच्या विषयाबाबतच्या सुनावणीकरिता पक्षकारातर्फे केवळ एकच वकील हजर राहतील आणि जर वकीलांची नेमणूक नसेल तर केवळ वैयक्तिक पक्षकारच उपस्थित राहील, उर्वरित सर्व सुनावण्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. याबाबत नागरिकांनी नोंद घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात अनावश्यकरित्या येवून गर्दी करण्याचे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.