जळगाव (प्रतिनिधी) लॉजेस्टिक कंपनीद्वारे घरपोच वस्तू वितरण करणाऱ्या कामगार बांधवांना माथाडी कायदा लागू करावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी माथाडी मंडळ कार्यालयाचे कामगार उपायुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अॅड. जमील देशपांडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सामान्य ग्राहकांचा ऑनलाईन खरेदी करण्याचा कल वाढला असून हवी ती वस्तू घरपोच मागवता येते. या वस्तू घरपोच आणणारे लॉजेस्टिक कंपनी चे कर्मचारी आपल्या खांद्यावर भली मोठी पिशवी अडकवून सदर वस्तू घरपोच देत असतात. सदर काम हे अंग मेहनतीचे आहे.जळगांव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हे कर्मचारी अशा प्रकारे काम करत आहे.
टीव्ही,फ्रीज,वॉशिंग मशीन,फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू,अशा अनेक वस्तू पोहचविण्यासाठी त्यांना बहुमजली इमारतीवर ओझे घेवून जावे लागते.त्या करीता त्यांना तुटपुंजे पैसे मिळतात श्रम मात्र जास्त होतात.जेवढ्या वस्तू घरपोच करतील तेवढे पैसे मिळतील. असे काम करणारे कामगार असंघटित व असुरक्षित क्षेत्रात मोडले जातात.नियमित वेतनाची कोणतीही खात्री त्यांना नाही.
म्हणून महाराष्ट्र माथाडी हमाल व ईतर श्रमजीवी कामगार,(नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ अन्वये अशा कामगारांना माथाडी कायदा लागू करावा व अशा लॉजेस्टिक कंपनीच्या कार्यालयांना सक्तीने पत्रव्यवहार करून त्यांचा आस्थापना माथाडी बोर्डात नोंदणी कराव्या अशी मागणी या पत्राद्वारे करीत असल्याचे अॅड. जमील देशपांडे यांनी म्हटले आहे.