अहमदनगर (वृत्तसंस्था) वास्तुविशारद अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी आज ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर तोफ डागली आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांना ‘अभिनेता’ म्हणून हिणवलं आहे.
अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर दडपशाही व आणीबाणीचा आरोप केला जात आहे.
अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी मुंबईतील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. गोस्वामी यांना अटक होताच भाजपनं राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर ठाकरे सरकारविरोधात आंदोलनं करा, उपोषण करा, मोर्चे काढा, असं आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपच्या या भूमिकेचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाते. द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जातो, अशावेळी भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवत नाही. पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं,’ असा बोचरा टोला रोहित पवारांनी हाणला आहे.