मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. अशात राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. म्युकरमायकोसिस संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे १ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने महाराष्ट्रात शिरकाव केलाय. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे १ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. इतकच नाही तर या आजाराबाबत केंद्र सरकारकडे महत्वाच्या तीन मागण्या केल्याचंही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत ६ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. त्यानंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यात सध्या १ हजार ५०० च्या आसपास म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती विविध कारणांमुळे कमी झाली आहे. तसंच ज्या रुग्णांच्या रक्तात आयर्न म्हणजेच फेरेटिनचं प्रमाण जास्त आहे, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका असल्याचं टोपे म्हणाले.
अशावेळी महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसंच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत ६ हजाराच्या आसपास आहे. एका रुग्णाला २० – २० इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. अशावेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी अशी आग्रही मागणी टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केलीय. त्याचबरोबर म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराबाबत जनजागृतीची गरज असल्याचं टोपे म्हणाले. काळ्या बुरशीवर प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे, त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याटं टोपे यांनी यावेळी म्हटलंय.