जळगाव (प्रतिनिधी) रिक्षातील प्रवाशाच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम जबरीने काढून जबरी लुट करणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. आयुष सुवर्णसिंग तोमर आणि पवन निवृत्ती लोहार (दोघे रा. श्रीकृष्ण नगर, कुसुबा – जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
जितेंद्रसिंग मौर्य हे एमआयडीसी परिसरातील चटई कारखान्यात काम करतात. ते 17 जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर रिक्षाने तिकीट काढण्यासाठी गेले होते. तिकीट काढल्यानंतर पुन्हा एमआयडीसी परिसरात येण्यासाठी त्यांना त्याच रिक्षाचालकाने आपल्या रिक्षात बसवले. रिक्षाचालकाने जबरदस्ती प्रवासी मौर्य यांना मेहरुण तलावाकडे नेले. त्याठिकाणी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने मौर्य यांच्या खिशातील पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि एक हजार रुपये रोख जबरीने काढून घेत पळ काढला.
यानंतर जितेंद्र मौर्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसीच्या पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने लागलीच तपासचक्र फिरवीत आयुष सुवर्णसिंग तोमर आणि पवन निवृत्ती लोहार यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांना 22 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, स.फौ. अतुल वंजारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, साईनाथ मुंढे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.
















