जळगाव (प्रतिनिधी) येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयाला बंगळूर स्थित ‘नॅक या अग्ननामांकित संस्थेने ‘A ग्रेड हे मानांकन प्रदान करुन केवळ संस्थेच्या, महाविद्यालयाच्याच नव्हे तर संपूर्ण खानदेशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईशी संलग्न असलेले हे महाविद्यालय उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्वस्तरातील विद्यार्थ्याच्या थेट घरापर्यंत शिक्षणाची गंगा घेवून जात असल्यामुळे ‘आसुसलेल्या डोळ्यांना स्वप्नाचा घाव देणारे महाविद्यालय’ म्हणून ते विद्यार्थीप्रिय झालेले आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थी भिमुखता आणि समाजाभिमुकता नॅक ला खूप भावली. सावित्रीबाई फुले विद्यार्थी सहाय्यक योजना/सायकल बँक योजना/मुठभर धान्य योजना/सावित्रीबाई फुले वाचक चळवळ/आपकी अदालत/निरुत्ती युवा फोरम/अर्थसंकल्पाचे विश्लेषण/ अनुवाद की पाठशाला/रॉक म्युझीयमाइंग्रजी रेमिडेयील कोर्स/भाषा प्रयोग शाळा/ विविध सामाजिक, शैक्षणिक व शासकीय संस्थाशी असलेले ऋणानुबंध प्रबोधनाचा जागर घालणारे असंख्य कार्यक्रम/दत्तक ग्राम/माजी विद्यार्थ्याचे व पालकाचे महाविद्यालयाप्रति असलेले जैविक संबंध या सर्व गोष्टींचे नॅकने विशेष कौतुक केले. महाविद्यालये हे पांढरे हत्ती ठरत असतानाच्या काळात हे महाविद्यालय अधिकाधिक उपक्रमशील व विद्यार्थीभिमुख होते आहे हे स्तुत्य वाटल्यामुळेच हे लक्षणीय यश प्राप्त होवू शकले. त्यासाठी संस्थचे अध्यक्ष प्रा. ए. पी. चौधरी, सचिव प्रा. बी. एम. महाजन यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री नेमाडे, नॅक समन्वयक डॉ. सतीश जाधव व नॅक सेक्रेटरी डॉ.एच.व्ही.चव्हाण यांनी अविरत व योग्य दिशेने केलेल्या परिश्रमाला सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी तितक्याच उत्स्फुर्तपणे केलेल्या सहकार्यामुळेच हे यश मिळू शकले अशी सर्वांची भावना आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणात कौतुक होते आहे.















