चोपडा (प्रतिनिधी) चोपडा येथील नगर वाचन मंदिर या तालुका वाचनालयाची 139 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अमरचंद सभागृहात विद्यमान अध्यक्ष आशिष गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सन 2024/29 या पाच वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी आशिष गुजराथी, तर कार्यवाह पदी गोविंद गुजराथी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीच्या निवडीसाठी सूचक म्हणून हितेंद्र देशमुख व रामचंद्र अग्रवाल तर अनुमोदक म्हणून राजेश राठोड, किरण गुजराथी यांनी निवडीसाठी कार्यकारिणीचे प्रस्ताव ठेवले. त्यानुसार नवीन कार्यकारणीमध्ये अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, सहकार्यवाह डॅा. परेश टिल्लू तसेच कार्यकारणी संचालक म्हणून चंद्राहास गुजराथी, श्रीकांत नेवे, धीरेंद्र जैन, संजय गुजराथी, ॲड. अशोक जैन, प्रफुल्ल गुजराथी, अवधूत ढबू, प्रभाकर महाजन, विलास सु. पाटील, डॅा. राहूल मयूर, डॅा. सुभाष देसाई, किरण गुजराथी, विद्या अग्रवाल, रजनी सराफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या वार्षिक सभेचे प्रास्ताविक कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी केले. वार्षिक सभेत एकूण सात विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. अहवाल वाचन गोविंद गुजराती यांनी केले तर आर्थिक पत्रकांचे वाचक डॉ. परेश टिल्लू यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा व वाचनालयाच्या माजी अध्यक्षा स्व. डॅा. सुशीलाबेन शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याबद्दल प्राध्यापक एस. टी. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी व गोविंद गुजराथी यांचा विविध निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. सभेचे आभार प्रदर्शन आशिष गुजराथी यांनी केले. अवधूत ढबू यांच्या वंदे मातरमने सभेचा समारोप झाला.
















