कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) चाळीसगाव येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्याकरीता नावलौकिक असलेले अशोक राठोड यांची भागिरथी भोईर प्रतिष्ठानमार्फंत समाजरत्न पुरस्कार-२०२१करीता निवड करण्यात आली आहे.
पक्षीमित्र, वृक्षमित्र, पर्यावरणस्नेही अशी स्वकर्तृत्वाने ओळख निर्माण करणारे तसेच सामाजिक, शैक्षणिक कार्यात भरीव कार्य करणारे अवालिया अशोक राठोड यांची दुर्बलांचे हित हेच आमचे साध्य असे ब्रिद वाक्य जोपासणारी पालघर जिल्ह्यातील चिंचघर, वाडा येथील सेवाभावी संस्था भागिरथी भोईर प्रतिष्ठानमार्फंत दखल घेण्यात आली. यासंदर्भात नुकतेच सदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश भोईर यांच्यातर्फे निवड पत्र देण्यात आले.
अशोक राठोड यांनी पक्ष्यांसाठी पाणपोईचे गावोगावी वाटप, मतदान जनजागृती, स्वच्छता जनजागृती, अनेक वेळा त्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजनाचे सर्वश्रेष्ठ कार्यही केलेले आहेत. एक राखी वृक्षांकरीता, राज्यभरातील १०१आदर्श शिक्षकांचा गौरव, कोरोना योद्धांचा गौरव, कर्तृत्ववान महिलांचा गौरव, बेटी बचाव बेटी पढाव, जन्मदिनी वृक्ष लावु अंगणी, सिड बाॅल, सामाजिक समस्या सुटावी याकरीता जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन, ग्रामस्थांना बि-बियाण्याचे वाटप करुन कृषी योजनेला विशेष सहकार्य, वेगवेगळे विशेष दिवस साजरे करुन संबंधित दिवसाचे महत्व पटविणे, जागतिक युवा दिनानिमित्त युवकांना मार्गदर्शन व्हावे याकरीता कार्यशाळेचे आयोजन, अन्नसुरक्षा दिनानिमित्त जनजागृती, शासकिय कागदपत्रांच्या मेळाव्याकरीता तसेच गावालगत असलेल्या पांझर तलावासंबंधी निर्माण झालेल्या समस्येविषयी वारंवार निवेदने तसेच अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळुन बंजारा समाजात जनजागृती व शैक्षणिक समस्येकरीता उल्लेखनिय कार्य घडवित आहे.
राठोड यांना साहित्य क्षेत्रातही रस असुन अनेक सामाजिक विषयांवरील लेख प्रसिद्ध आहेत. कोविड काळात गावातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणुन ‘गच्चीवरची शाळा’ असा या नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे राज्यभर कौतुक करण्यात आले होते. सदर अशा विविध भरीव कार्याची दखल भागिरथी या प्रतिष्ठानामार्फंत घेण्यात येऊन पुरस्काराकरीता निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.