नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयम सुटला. राजकारणात संयमी भाषणशैलीसाठी नितीशकुमार प्रसिद्ध आहेत. मात्र, शनिवारी निवडणूक प्रचारात बेगुसराय येथील रॅलीत नितीशकुमार यांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. तेजस्वी यादव यांच्यावर टीका करताना, ते म्हणाले की, ‘तुम्हाला संधी होती, तेव्हा एखादे शाळा-महाविद्यालय उभारले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा.’
बिहारच्या पहिल्या टप्प्यातील ७१ जागांवर २८ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. याच दरम्यान बेगुसराय येथील रॅलीमध्ये संबोधित करताना नितीशकुमार म्हणाले की, ‘इतरांना सरकार बनविण्याची संधी मिळाली. त्यांनी बिहारमध्ये काय केले? एखादं शाळा-महाविद्यालय बांधले का? आज तुम्हाला शिकायचे आहे, तर सरकार असताना शाळा-महाविद्यालय बांधले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर भर देण्याऐवजी ‘जंगलराज’वर भर देणाऱ्यांनी नोकरी व विकासावर बोलणे म्हणजे थट्टाच आहे.
बिहार निवडणूक प्रचारादरम्यान नितीश यांच्याकडून लालूप्रसाद यादव व राबडीदेवी सरकारच्या कार्यकाळावरून निशाणा साधला ते म्हणाले की, सत्तेत असताना यांनी पैसा खाल्ला. तुरुंगात जावं लागल्यानंतर खुर्चीवर पत्नीला आणून बसवलं. आपल्या बिहारमध्ये हे होत होते. पण, आता माझ्या सरकारमध्ये एखादे चुकीचे कृत्य केले, कायदा मोडला, तर त्याला थेट तुरुंगात जावे लागतं, असेही नितीशकुमार म्हणाले.