मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज सोमवारी होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा धर्म पाळत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे हात मजबूत केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा 1 वाजता काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना फोन करुन अधिकची मतं कॉंग्रेसला देणार असल्याचं म्हटलंय.
शिवसेनेकडे असलेली अधिकची 4 ते 5 मतं शिवसेना काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेकडे एकूण 55 आमदार आहेत, तर विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनच्या 2 उमेदवारांना प्रत्येकी 26 मतं आवश्यक आहेत. मात्र, त्या उमेदवारांना आवश्यक मतांपेक्षा 2 मतं जास्त देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. म्हणजेच 28 प्लस 28 एकूण 56 मतं शिवसेनेचे स्वतःच्या उमेदवारांना मिळणार आहेत. त्यात एक अपक्ष आमदाराचं मत असेल. त्यामुळे, शिवसेनेकडे अपक्षांची अतिरिक्त असेलली मतं शिवसेना काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेसोबत 7 अपक्ष आमदार आहेत, त्यांपैकी उर्वरीत मतं कॉंग्रेसला देण्यात येणार आहेत.
आमदारांची विधानभवनाकडे आगेकूच
सकाळपासूनच आमदारांची विधानभवनाकडे आगेकूच होताना दिसून येत आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे स्वत: एक बस घेऊन विधानभवनाकडे निघाले आहेत. तर, भाजप नेतेही बसमधूनच विधानभवनात पोहोचले आहेत. त्यामुळे, 1 उमेदवाराचा पराभव होणार आहे, तो आमदार कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला असून सायंकाळपर्यंत त्याचं उत्तर मिळेल. दरम्यान, मुख्यमंत्रीपद आणि सरकार टिकविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मतं देण्याचा निर्णय घेतल्याची टिका भाजपकडून होत आहे.
आषाढी वारीला सोमवारी सुरुवात होत आहे. विधान परिषदेच्या वारीत विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता सर्वत्र आहे. रविवार असूनही राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या आघाडीच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली. दरम्यान, फोर सीझन हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते व आमदारांशी चर्चा केली.