जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने राज्यस्तरीय कनिष्ठ गट मुलं आणि मुली निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा जळगावच्या खानदेश मॉल सेंटर येथे सुरू असून मंगळवार स्पर्धेचा दुसरा दिवस तर स्पर्धेतील चार राउंड पूर्ण झालेले असताना मुलींमध्ये मुंबई व जळगाव तर मुलांमध्ये मुंबई, जालना, ठाणे, धुळे व सातारा हे जिल्हे आघाडीवर आहे.
तिसऱ्या व चौथ्या फेरिचे उदघाटन
तीसरी फेरी
सकाळी ९ वाजता सुरु झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्याचे उद्घाटन लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापिका प्रतिभा ताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा त्यांनी खेळाडूंना व पालकांना मार्गदर्शन करताना बुद्धिबळ खेळाडू हा आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत होणाऱ्या युद्धांमध्ये सुद्धा तरबेज असतो कारण त्याला पटलावर घोडे, हत्ती व राजा शी झूंज द्यावी लागते यावेळी त्यांच्यासोबत लोकसंघर्ष युवा मोर्चाचे भरत कर्डिले, फारुक शेख व मंगेश गंभीरे हे उपस्थित होते.
चौथी फेरी
दुपारी अडीच वाजता सुरु झालेल्या चौथ्या फेरीचे उदघाटन उत्तर महाराष्ट्र कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनीसुद्धा खेळाडूंना आपले करियर बनवण्यासाठी खेळ हा महत्त्वाचा घटक असून त्या घटकांमध्ये बुद्धिबळ याला वेगळे स्थान आहे. त्यामुळे आपण खेळांमध्ये सातत्य व चिकाटी ठेवा असे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासह फारुक शेख, नंदलाल गादिया, प्रवीण ठाकरे आदी उपस्थित होते. मंगळवारी आलेल्या आतिथिनचे स्वागत संघटनेचे सचिव नंदलाल गादिया व उपाध्यक्ष फारूक शेख यांनी केले.
तिसऱ्या फेरी अखेरचे महत्वाचे निर्णय
मुलांच्या गटात तिसऱ्या फेरी अखेर मुंबईचा पुष्कर डेरे, जीत शाह तर ठाण्याचा श्रेयस घाडी, साताऱ्याचा साहिल शेजल, जालन्याचा वेदांत घाडगे, धुळ्याचा मंथन निमोणकर ३ गुणांसह आघाडीवर असून अडीच गुणांसह ठाण्याचा प्रथमेश दिवेकर, ओम देवरुखकर, नागपूरचा दिशांक बजाज, संघर्ष ओले, पुण्याचा स्नेहांकित बापट संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या पटावर परत सिसिलियन बचावाचा अवलंब केला आणि आपल्या स्पर्धा अनुभवाच्या जोरावर सहजरीत्या विजय संपादन केला, दुसऱ्या पटावर जीत शाह ने प्रतिस्पर्ध्याच्या फ्रेंच पद्धतीचा बचाव आक्रमकपणे भेदत सहजरीत्या विजय मिळवला. मुलींच्या गटात तिसऱ्या फेरी अखेर, जळगावच्या भाग्यश्री पाटील, मुंबईच्या युती पटेल, मुंबई चीच क्रिती पटेल, जळगावची सानिया तडवी यांनी ३ गुणांसह आघाडी घेतली असून गुरमित कौर ही स्थानिक खेळाडू अडीच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
पहिल्या पटावर ओपनिंग मध्येच डावाच्या मध्यभागी प्यादाची चाल खेळत मोहऱ्यांची मारामारी करण्याचा प्रस्ताव गायत्री समोर ठेवला, सावधपणे आपल्या राजाला किल्ल्यात ठेवला पण समोरच्या राजाला आपल्या हत्तींकडून शह व माताची धमकी दिली, वजिरांची पण मारामारी झाल्यामुळे गायत्रीच्या चाली निष्प्रभ झाल्या व तिने शरणागती पत्करली. युती पटेल हिने अर्चीताच्या सिसिलियन बचावाला ‘स्मिथ मोरा’ या अतिशय क्लिष्ट व धाडसी प्रतिउत्तराचा वापर करीत डावाच्या सुरवातीलाच प्यादाचे बलिदान केले व अर्चीताला शेवटपर्यंत सावरण्याची संधीच दिली नाही.