मुंबई (वृत्तसंस्था) बलात्काराच्या आरोपावरुन मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी गुजरातमधून एका बाबाला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कांदिवली परिसरात एका आध्यात्मिक बाबाने महिलेला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या घटनेचा पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत.
गौतम गिरी घनश्याम गिरी गोसाई असं अटक केलेल्या २६ वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपी गौतम गिरी याने काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका महिलेला विविध प्रकारचे आमिष दाखवून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं होतं. याप्रकरणी पीडितेनं गुन्हा दाखल केल्यानंतर, एका बाबाला पोलिसांनी अटक केली होती. पण आरोपी गौतम गिरी फरार होता.
याप्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी गौतम गिरी घनश्याम गिरी गोसाई या आध्यात्मिक बाबाला गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी ही कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने आरोपीला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कांदिवली पोलीस आरोपीची सध्या कसून चौकशी करत असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे.