जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जामनेर पोलीस स्थानकात अॅट्रासीटीचे गुन्हे दाखल असून याची दखल घेतली जात नाही. तसेच तक्रारदाराचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले नाही. यामुळे सौ. खोनगारे व उपसरपंच महिला भाग्यश्री पाटील व कार्यकर्ते सदस्यांनी पाचोरा येथे डिवायएसपी यांच्याकडे धाव घेतली. तेथेही आजपावेतो कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळं आदिवासी पारधी महासंघाने गृहमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, नुकत्याच जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या आहेत. सामाजिक आरक्षणानुसार सरपंच पदासाठी घटनादत्त अधिकारान्वये अनुसूचित जमाती तथा जाती यांचे काही महिला व पुरुष सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत राजकीय सत्ता परिवर्तन झाली आहे. परंतू वर्षानुवर्ष ग्रामविकासाच्या नावाखाली सरकारी मलीदा स्वतःच्या खिशात घालणारे अनेक ग्रामपंचायत नेत्यांना आपली झालेली हार अद्यापही पचनी पडलेली दिसत नाही. यानुसारच वाधारी ग्रुप ग्रामपंचायतीवर आघाडी सरकारचे पॅनल बहुमताने निवडून येऊन या ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) महिला सौ. माया मोहनसिंग खोनगरे या पदवीधर महिला सरपंचपदी विराजमान झालेल्या आहेत. पण ग्रामविकासाचा पैसा खाण्याची चटक लागलेल्या व सरकारी पैसा ओरबडणाऱ्या विरोधी सदस्यांना ही गोष्ट अजिबात खपत नाही. त्यामुळे या आदिवासी बहुमतात असलेल्या सरपंच महिलेस त्या सरपंच झाल्या पासून विरोधी सदस्य सतत त्यांना हटविण्याचा खटाटोप करत आहेत.
ग्रामपंचायतीची मासिक मिटींग असो किंवा ऑनलाईन ग्रामसभा असो या मिटींगमध्ये तसेच दररोजच ग्रामपंचायतीत धुडकूस घालणे सरपंच महिलेस जातीवाचक घालून पाडून बोलणे त्यांचे बहुमत कमी करण्यासाठी सदस्यांना दादागीरी करुन भारठोक करणे प्रलोभन दाखविणे अशा सामदाम दंड भेद या सर्व अस्त्रांचा वापर ते करीत आहे. गेल्या ऑन लाईनमिटींग (दि. २९/५/२०२१ रोजी) मध्ये या सत्तापिपासू नराधमांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोखरा समितीचे गठण करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या मिटींगमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड धुमाकूळ घातला व सदर मिटींग उधळून लावली. यात अनेक वेळा जामनेर पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्हयांचे आरोप असलेले गुन्हेगार बिनधास्तपणे लाठयाकाठया घेऊन ग्रामपंचायतीच्या मुख्य दरवाजावर व खिडक्यांवर लोखंडी सळया व काठयांचा वापर करुन आदिवासी सरपंच महिलेस अर्वाच्च शिवीगाळ करत हल्ला केला गेला व सत्ताधारी सदस्यांना मारहाण केली. सरपंच सौ. माया मोहन खोनगारे यांना जातीवरुन घाणेरड्या शिव्या देऊ नका असा समज घालणाऱ्या रामनाथ मंगरुळे व त्याच्या मुलास बेदम मारहाण ही करण्यात आली व सभा उधळून लावली.
सदर सततच्या जाचाला कंटाळून सौ. माया खोनगारे ( सरपंच) यांनी जामनेर पोलीस स्टेशनात अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल केला. परंतु त्यांच्या तक्रारीची जामनेर पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही. त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले नाही. म्हणून सौ. खोनगारे व उपसरपंच महिला भाग्यश्री पाटील व कार्यकर्ते सदस्यांसह पाचोरा येथे डिवायएसपी यांच्याकडे धाव घेतली. तेथेही आजपावेतो कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात विशेष आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे नुकतीच जामनेर तालुक्यातील तिघे वडगाव येथे एका अनुसूचीत जातीच्या महिलेसह तिच्या कुटूंबियांना गावातील घनदांडग्या कुटूंबाने किरकोळ कारणावरून रक्तरंजित होई पावेतो तिला व कुटूंबियांना मारहाण केली. सदर कुटूंबियास रक्त बंबाळ होईपर्यंत अमानवीय रित्या बराच वेळ होत असलेल्या मारहाणीचे दृश्य सोशल मिडीयावरती व्हायरल होऊन सर्व राज्यभर दिसत आहे. या महिलेने कुटूंबासह जामनेर पोलीस स्टेशन गाठले. परंतु तेथे या महिलेस न्याय मिळणे ऐवजी पैशांच्या माध्यमातून तोडीपाणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या महिलेने अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा आग्रह धरल्यावर जामनेर पोलीसांनी आरोपीची बाजू घेऊन अन्याय ग्रस्त महिलेवर दरोडयाच्या गुन्हयाअंतर्गत केस दाखल करून उलट तिलाच जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तोडीपाणी करुन सदर केसची विल्हेवाट लावली असल्याचे ऐकीवात आहे.
हे उदाहरण ताजे असतांनाच वाधारी सरपंच महिलेच्या अॅट्रासिटी केस बाबतही असेच काही घडण्याचे संकेत दिसत आहेत. घटनाकारांनी या उपेक्षित जमातींच्या रक्षणासाठी अॅट्रासिटी सारखा कायदा निर्माण केला. पण “जिसकी लाठी उसकी म्हैस” या उक्ती नुसार प्रचंड धन व त्यातून तालुक्यातील गावागावात गुंडांची मोठी फौज निर्माण करुन तालुक्यातील राजकारणावर जिवनाच्या अंता पर्यंत आपलेच वर्चस्य राहावे यावृत्तीने कार्य करणाऱ्या राजकीय नेत्यांमुळे असे अन्याय होतच राहतील. त्यातच अशा प्रवृत्तीचे गुलाम बनून पैशांच्या प्रलोभनापायी सत्याला पायदळी तुडवत त्यावरुन रपेट करणाऱ्या पोलीसांची फौज तालुक्यात मोकाट जनावरांप्रमाणे फिरत असेल तर गोरगरीबांवर अन्याय व सत्याची पायमल्ली होतच राहील. यात शंक नाही. असे निवेदनात म्हंटले आहे.
















