नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानाची मंगळवारी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ओवेसींच्या हिंदूविरोधी वक्तव्यांमुळे संतप्त झालेल्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ओवेसींच्या घराबाहेर निदर्शने केली आणि यादरम्यान तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच लोकांना ताब्यात घेतले आहे.
हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या २४-अशोक रोड, नवी दिल्ली येथील निवासस्थानी निदर्शने केली आणि तोडफोड केली. आंदोलकांनी ओवेसी यांच्या घराबाहेर नेम प्लेट, दिवा आणि खिडकीच्या काचा फोडल्या. या दरम्यान असदुद्दीन ओवेसी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. घटनेनंतर नवी दिल्ली उच्च पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाच जणांना ताब्यात घेतले.
“ओवेसींविरोधात उत्तर प्रदेशात हिंदूविरोधी वक्तव्यांसाठी गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि काही वर्षांपूर्वी त्याच्या भावालाही हिंदूविरोधी वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. ओवेसी बंधू नेहमीच मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी हिंदूंचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असतात,” असे हिंदू सेनेने म्हटले आहे.