जळगाव (प्रतिनिधी) जून्या वादातून घरात जेवण करणाऱ्या चंद्रशेखर त्र्यंबक पाटील (वय ५५, रा. गणपती नगर कुसुंबा, ता. जळगाव) यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने गोळीबार करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करीत दुचाकीची तोडफोड केली. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुसंबा येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून टोळक्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणपती नगरात चंद्रशेखर पाटील हे वास्तव्यास असून त्यांचा कुरीयर पार्सलचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा करण पाटील आणि किरण खर्चे याचे पुर्वीपासून आपआपसात वाद आहे. दि. ४ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चंद्रशेखर पाटील हे घरात पत्नीसोबत जेवण करीत होते. यावेळी त्यांच्या घराबाहेर काही इसम मोठमोठ्याने शिवीगाळ करीत करीत होते. तसेच करण याला तु कोठे लपला आहे बाहेर ये तुला आम्ही दाखवितो असे म्हणत होते. दरम्यान, चंद्रशेखर पाटील यांनी खिडकीतून बाहेर डोकावून बघितले असता, घराबाहेर उभे असलेले सहा ते सात जणांनी घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
दुचाकीची केली तोडफोड
या दगडफेकीत चंद्रशेखर पाटील यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच टोळक्याने घराबाहेर लावलेल्या पाटील यांच्या दुचाकीची तोडफोड करीत नुकसान केले. यावेळी तोडफोड करणारे हे तुम्ही आमचा भाऊ किरण खर्चे याच्या नांदी लागू नका नाहीतर, करणला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत होते.
दोन वेळा झाडल्या गोळ्या
धमकी देत असलेल्या टोळक्याने त्याच्याजवळ असलेल्या गावठी कद्वयातून चंद्रशेखर पाटील यांच्या दोन वेळा गोळी झाडून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. यातील एक गोळी ही घरातील टिव्ही लागून नुकसान झाले. त्यानंतर टोळक्याने दुचाकीवर बसून तेथून पसार झाले.
पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
दोन काडतूसाच्या पुंगळ्या जप्त
घटनास्थळी फारेन्सीकचे पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांना घटनास्थळाहून दोन रिकामे काडतूसाच्या पुंगळ्या मिळून आल्या असून त्या जप्त केल्या आहे.
रात्री उशिरा टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल
गोळीबाराच्या घटनेनंतर चंद्रशेखर पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित किरण खर्चे, गणेश उर्फ विक्की ज्ञानेश्वर गोसावी, सचिन प्रभाकर सोनवणे, हर्षल रामचंद्र महाडीक, निखिल अनिल चव्हाण, रवी राठोड, राकेश कैलास पाटील, दिनेश पवार (सर्व रा. सुप्रिम कॉलनी) यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
जून्या वादातून टोळक्याने थेट भरवस्तीमध्ये गोळीबार केल्यामुळे एकच खळबळ माजून गेली आहे. भरवस्तीत गोळीबाराची घटना घडत असल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरलेला नसल्याची चर्चा परिसरात सुरु होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातवारण निर्माण झाले आहे.
तपासचक्रे फिरवित टोळके जेरबंद
गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. त्यांच्या शोधार्थ पथके रवाना केली असता, यातील गणेश उर्फ विक्की ज्ञानेश्वर गोसावी, सचिन प्रभाकर सोनवणे, हर्षल रामचंद्र महाडीक, निखिल अनिल चव्हाण, रवी राठोड या पाच जणांना (सर्व रा. सुप्रिम कॉलनी) यांना अटक केली आहे.
















