मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता भाजपाने आक्षेप नोंदवला आहे. याप्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम १५४अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला सामना या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले. या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असं भातखळकर म्हणाले.