मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट बाहेर पडला आहे. मात्र, या आमदारांना मोठे घबाड मिळाल्यानेच ते बाहेर पडल्याचा दाट संशय निर्माण झाला असून एका आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आपल्याला ५० कोटी रुपये देत होते. पण पैशाला काय करायचे आहे, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हंटले आहे. दरम्यान, या क्लिपमुळे फुटीर आमदारांना मोठे घबाड मिळल्याचे दिसत आहे.
‘आपल्याला ५० कोटी रुपये देत होते. पण पैशाला काय करायचे आहे. जीवन महत्वाचे. माझी सुखी राहण्याची इच्छा आहे’, असे हा आमदार कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. हा आवाज कोणत्या आमदाराचा आहे, याची चौकशी केली असता, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा हा आवाज असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुवाहाटीवरून एकनाथ शिंदे यांना गुंगारा देवून नितीन देशमुख महाराष्ट्रात परत आले. त्यांनी शिवसेनेसोबतच राहण्याचा स्वाभिमानी निर्णय घेतला. त्याबद्दल प्रितम नावाच्या एका व्यक्तीने देशमुख यांना फोन केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
या व्यक्तीने देशमुख यांचे कौतुक व अभिनंदन केले. त्यावेळी आपल्याला 50 कोटी रूपये देत होते. पण पैशाला काय करायचंय असे हे आमदार म्हणजेच देशमुख बोलत असल्याचे दिसत आहे. नितीन देशमुख यांना 50 कोटी रुपये ज्या लोकांनी देऊ केले, त्यांनी इतर फुटीर आमदारांसाठी सुद्धा हा आकडा ऑफर केलेला असू शकतो, असे चर्चेला आता उधाण आले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे व हिंदुत्वाप्रती निष्ठा सांगणारे ढोंगबाजी करीत असल्याचेही यातून दिसत आहे.