मुंबई (वृत्तसंस्था) शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतरण करण्यात आले आहे तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यात आले आहे.
आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असंही ते म्हणाले. तसेच आता हा ठराव विधानसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्राकडे पाठविला जाणार आहे. शिवाय याला मंजूरी मिळणार असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर बोचरी टिका केली. मावळत्या सरकारने हे निर्णय तर घेतले पण ते सर्व घटनाबाह्य होते. केवळ जबाबदारी झटकून द्यायची म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला होता. पण आता उगवत्या सूर्याच्या साक्षीने तयार झालेल्या सरकारचे निर्णय आहेत. त्यामुळे घेतलेले निर्णय लवकरच अस्तित्वातही येणार असल्याचे त्यांनी सांगितले.