हिंगोली (वृत्तसंस्था) कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण येथील दोन चिमुकल्यांचा आईच्या डोळ्यासमोर इसापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. आरुष अमोल खंदारे (वय ५), प्रणव अमोल खंदारे (वय ३), अशी मयत बालकांची नावे आहेत. तर आम्रपाली अमोल खंदारे (वय ३२), बचावलेल्या आईचे नाव आहे.
कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण येथील आम्रपाली अमोल खंदारे ( वय ३२) ही महिला आरुष अमोल खंदारे (वय ५) प्रणव अमोल खंदारे (वय ३) या आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन कपडे धुण्यासाठी गावालगत असलेल्या ईसापूर धरणावर गेली होती. ती महिला कपडे धुत असताना तिची मुले धरणाच्या कडेला खेळत होती. सदर महिला धुणे धुण्यात व्यस्त असताना तिची दोन्ही मुले खेळत खेळत पाण्यात गेली. धुणे झाल्यानंतर त्या महिलेने आपल्या दोन्ही मुलांना पाहिले. परंतु ती दोन्ही मुले तिला दिसली नाहीत. मुले दिसत नाहीत हे पाहून तिने मोठ्याने हंबरडा फोडला. माझ्या लेकरांनो तुम्ही कुठे आहात, मी तुमच्याकडे येत आहे, असे म्हणून तिने पाण्यात उडी घेतली.
मुलांचा शोध घेत असतांना महिला पाण्यात बुडत असताना जवळ असलेल्या शेतात कापूस वेचणाऱ्या महिलांनी पाहिले. त्या महिलांनी आरडाओरड सुरु करताच गावातील गजानन मस्के हे तिथे आले त्यांनी आम्रपाली खंदारे या महिलेला पाण्याबाहेर काढून दुचाकीवरून उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर तिला घरी पाठविण्यात आले. तर दुसरीकडे दोन्ही चिमुकल्याचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्यानंतर शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नंतर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दोन्ही मुलाचे शवविच्छेदन केले. गुरूवारी (दि.२३) रात्री उशिरा या दोन्ही मुलावर मोरगव्हाण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.