टोकयो (वृत्तसंस्था) सध्या टोकयो पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. त्यानंतर आता १० मीटर एयर राइफल स्पर्धेत अवनी लेखराने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं आहे. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे.
अवनी या इव्हेंटच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सातव्या स्थानी होती. अंतिम सामन्यात तिनं धमाकेदार खेळी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. नऊ राऊंडच्या या अंतिम सामन्यात अवनी आणि चिनी अॅथलिट्स सी झांग यांच्यात अटितटीची लढत पाहायला मिळाली. झांगनं क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये सर्वात अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यामुळे या सामन्यात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार म्हणून झांगकडे पाहिलं जात होतं. दरम्यान, अवनीनं अचूक वेध साधत झांगचं आव्हानं संपुष्टात आणलं आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अवनीनं नऊ राउंडमध्ये ५२.०, ५१.३, २१.६, २०.८, २१.२, २०.९, २१.२, २०.१, २०.५ सह एकूण २४९.६ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.