कर्नाल (वृत्तसंस्था) हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीबाहेर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला. त्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले. अनेकांची डोकी फुटल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांत व्हायरल झाली आहेत. कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करनालमध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपाचे ६ खासदार, ६ राज्यसभा खासदार, १२ आमदार, माजी आमदार आणि लोकसभा, विधानसभा लढलेले उमेदवारांसह संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला आले होते. यावेळी विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी शनिवारी कर्नालच्या घरौंडा येथील बसताडा टोल नाक्यावर ठिय्या मांडून बसले होते. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
शुक्रवारी शेतकरी नेत्यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून भाजपा नेते आणि बैठकीचा विरोध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर करनालमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली होती. सर्व ग्रामीण रस्ते सील करण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांनी नॅशनल महामार्ग ४४ वरील बसताडा टोल नाक्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी दुपारी सव्वा बारा वाजता लाठीचार्ज केला. यात काही शेतकरी जखमी झाले आहेत.
शेतकऱ्यांचं रक्त सांडलं. शरमेने भारताची मान खाली गेली – राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “पुन्हा शेतकऱ्यांचं रक्त सांडलं. शरमेने भारताची मान खाली गेली”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.