नशिराबाद प्रतिनिधी : नशिराबाद शहरात गोवंश मांस सापडण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दि. ३० डिसेंबर रोजी ८० किलो वजनाचे गोमांस जप्त झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच चार जानेवारी २०२६ रोजी पुन्हा नशिराबादमध्ये गोवंश मांस आढळून आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नशिराबाद येथील मन्यार मोहल्ला भागात सईद चुनीवाले यांच्या बंद घरासमोर सार्वजनिक ठिकाणी तब्बल ३० किलो वजनाचे गोवंश मांस व एक लोखंडी कोयता पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जप्त केला. याप्रकरणी जाबीर खान अय्याज खान कुरेशी (वय २८, रा. रहिमतपुरा, नशिराबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ श्री. केदार बारबोले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नशिराबाद योगिता नारखेडे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहेत. राज्यात गोवंश हत्येवर बंदी असतानाही नशिराबादमध्ये वारंवार गोवंश मांस सापडणे ही गंभीर बाब असून यामुळे गोरक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, नशिराबाद परिसरात शेतकऱ्यांच्या गायी-बैल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अद्याप एकाही चोरीच्या प्रकरणाचा तपास लागलेला नाही. यामुळे गोवंश मांस प्रकरणातील आरोपीच या चोरीमागे तर नाहीत ना? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पुन्हा पुन्हा असे प्रकार घडत असताना प्रशासन केवळ कारवाईपुरतेच मर्यादित राहणार का ? असा थेट सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. नशिराबादमध्ये वारंवार घडणाऱ्या या प्रकारांचा सखोल तपास करून मुळाशी जाणे गरजेचे असून, कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी ठाम अपेक्षा नागरिक व शेतकरी वर्गाकडून पोलीस प्रशासनाकडे व्यक्त केली जात आहे.
















