बुलढाणा (वृत्तसंस्था) कोणासमोर हात पसरून सत्ता, पद आणि पदासाठी भीक मागणे ही आपली संस्कृती नाही. माझे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला पद किंवा सत्तेसाठी भीक मागण्याची शिकवण दिली नाही, असे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सांगितले. बुलढाणा येथे एका जाहीर कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भाजपाकडून आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना संधी मिळालेली नाही. दरम्यान, तावडेंना भाजपाकडून राष्ट्रीय स्तरावर मोठी जबादारी देत, अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून नियुक्त केले गेले आहे. त्यामुळे आता पुन्हा पंकजा मुंडे यांना डावलल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पंकजा मुंडेनी एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे.
“मला एखादे पद दिले की नाही याने काही फरक पडत नाही. महत्त्वाचे म्हणजे मला सामाजिक कार्य आणि गरिबांची सेवा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नवीन सरचिटणीसांची यादी जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.