जळगाव (प्रतिनिधी) महावितरणने २०२२ -२३ या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात एक लाख ७० हजार २६३ कृषी पंपांना वीज कनेक्शन देऊन गेल्या दहा वर्षातील सर्वोत्तम कामगिरी केली असून याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कृषीपंपांना दहा वर्षातील सर्वाधिक वीज कनेक्शन देण्यासोबतच प्रलंबित कनेक्शनची संख्या आतापर्यंतची सर्वात कमी झाल्याने महावितरणला दुहेरी यश मिळाले आहे, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी ऊर्जा खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महावितरणला शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली होती. शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरल्यानंतर कृषीपंपासाठी प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यास विलंब होतो, त्याला पेड पेंडिंग म्हणतात. मा. ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानुसार कृषीपंपांना प्राधान्याने वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरणने योजना आखली. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गेल्या दहा वर्षामध्ये एका आर्थिक वर्षातील कृषीपंपांची सर्वाधिक वीज कनेक्शन देण्यात यश मिळविले. यापूर्वी २०१९ -२० या आर्थिक वर्षात ९६ हजार ३२७, २०२०-२१ या आर्थिक वर्षात एक लाख १७ हजार ३०४ आणि २०२१ -२२ या आर्थिक वर्षात एक लाख ४५ हजार ८६७ कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यात आली होती.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे कृषीपंपांच्या प्रलंबित वीज कनेक्शनची संख्या कमी होऊन ती एक लाख ६ हजार ३४० इतकी झाली आहे. ही आतापर्यंतची एका आर्थिक वर्षातील सर्वात कमी संख्या आहे. याआधी २०१९ -२० या आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्रलंबित कनेक्शनची संख्या एक लाख ६७ हजार ३८३ होती तर २०२० -२१ मध्ये एक लाख ८४ हजार ६१३ आणि २०२१ -२२ मध्ये एक लाख ८० हजार १०४ होती.
महावितरणने नुकत्याच संपलेल्या २०२२ – २३ या आर्थिक वर्षात दिलेल्या कृषी पंपांच्या कनेक्शनचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षात महावितरणने एकूण १ लाख ७० हजार कनेक्शनपैकी १ लाख ५९ हजार कनेक्शन ही पारंपरिक पद्धतीने दिली आहेत. सौरपंप किंवा उच्चदाब वितरण प्रणाली या विशेष योजनांतील केवळ ११,००० कनेक्शन आहेत. याआधीच्या वर्षात दिलेल्या एक लाख ४५ हजार ८६७ कृषीपंप कनेक्शनपैकी ४६ हजार १७५ कनेक्शन ही सौर किंवा उच्च वीजदाब प्रणालीतील होती. २०२२ -२३ मध्ये सौर आणि उच्चदाब वितरण प्रणाली योजनांचा फारसा आधार नसताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने दिलेल्या कनेक्शनची कामगिरी उल्लेखनीय आहे. २०२२ -२३ या आर्थिक वर्षात सर्वोत्तम कामगिरी झाल्यामुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून नव्या आर्थिक वर्षात प्रलंबित कृषीपंप वीजजोडण्या जलदगतीने देण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.
गावाबाहेर शेतामध्ये दूर दूर असलेल्या विहिरींसाठी कृषी पंप कनेक्शन देताना अनेक अडचणी येतात. कृषी पंपाला वीज कनेक्शन देण्यासाठी विजेचे खांब, वाहिन्या इत्यादी सुविधा आधी निर्माण कराव्या लागतात. पावसाळ्यात तसेच शेतात पिके उभी असताना विजेचे खांब उभारणे, वाहिन्या जोडणे, ट्रान्सफॉर्मर बसविणे ही कामे करता येत नाहीत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, सततचा पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतांमध्ये वीज कनेक्शनच्या पायाभूत सुविधा उभारण्यात अनेक अडथळे आले. तरीही महावितरणने दहा वर्षातील सर्वाधिक वीज कनेक्शन देणे आणि प्रतीक्षा यादीतील संख्या कमी करून हे यश मिळविले.
ऊर्जामंत्र्यांनी पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याची सूचना दिल्यानंतर महावितरणने हे काम आव्हान म्हणून स्वीकारले. कृषी पंपांना कनेक्शन देण्यासाठी कामाचा पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण राज्य पातळीवर दर पंधरा दिवसांनी स्वतः अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आढावा घेत होते. कृषी पंपांना कनेक्शन हा महावितरणसाठी अत्यंत प्राधान्याचा विषय झाला व त्याचा सातत्याने पाठपुरावा चालू होता. शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासाठी राज्य शासनाने ८०० कोटी रुपयांचा निधी दिला तर महावितरणने स्वतःचा २४१ कोटी रुपये निधी खर्च केला. याखेरीज शेतकऱ्यांच्या वीजबिल वसुलीतून मिळालेला पैसाही कृषीपंपांना कनेक्शन देण्यासाठी वापरण्यात आला.