भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनेक नागरिकांची क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली जवळपास २३ लाख ६० हजारांची फसवणूक झाली आहे. या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीवरुन भडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित हे हे छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांनी पथकासह छत्रपती संभाजी नगर जावुन क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या मूळ तालुक्यातील महिंदळे येथील ज्ञानेश्वर योगराज देवरे (वय ३९, वाळुज, जि. औरंगाबाद ) व बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी बावरा येथील राजू कतीराव शेरे (वय ३६, रा. बजाजनगर, वाळूज, जि. औरंगाबाद) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दोघांना भडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पो.नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.कॉ. सुनील राजपूत, पो. कॉ. प्रवीण परदेशी, पो. कॉ. संदीप सोनवणे यांनी ही कारवाई केली. तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत.