नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारमधील आरोग्य विभागाच्या कोरोना तपासणी यादीवर नजर टाकल्यास या कारभाराचा खरा चेहरा समोर येईल. या यादीमध्ये स्वॅब तपासणीसाठी दिलेल्या लोकांमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी इतकच काय तर अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता अक्षय कुमार यांची नावे असल्याचे समोर आले आहे. कोरोना चाचणी अरवाल जिल्ह्यामध्ये झाली आहे.
खोट्या कोरोना चाचण्यांचा भांडाफोड बिहारमधील अरवाल जिल्ह्यात झालाय. या प्रकरणामध्ये खोटी नावं नोंदवून करोना चाचण्या करण्यात आल्यांचं दाखवण्यात आलं असून यात देशातील बड्या नेत्यांबरोबरच सिनेसृष्टीमधील बड्या व्यक्तींची नावंही आरटी-पीसीआर चाचण्यांच्या यादीमध्ये आहे. २७ ऑक्टोबर रोजी अरवाल जिल्ह्यातील कारपी ब्लॉकमध्ये या चाचण्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे ज्या प्रसिद्ध व्यक्तींची नावं या यादीमध्ये आहेत ते बिहारचे नाहीत. तसेच ते कधी बिहारमध्ये वास्तव्यासही नव्हते. तरीही वेगवेगळ्या गावांमधील पत्ते या प्रसिद्ध नावांसमोर लिहिण्यात आले आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव या यादीमध्ये तिनदा आलं आहे. काँग्रेसचे बिहारमधील माजी पक्षप्रमुख राम जतन सिंन्हा यांच्या पूर्णा गावातील पत्ता मोदींच्या नावापुढे लिहिलेला आहे. तसेच प्रियंका चोप्रा हे नाव यादीमध्ये सहावेळा आलं असून कारपी ब्लॉकमधील जोनहा गावाचा पत्ता तिच्या नावापुढे आहे.
अक्षय कुमारचं नाव चार वेळा तर अमित शाह यांच्या नावाचा उल्लेख या यादीमध्ये दोनदा करण्यात आलाय. उपलब्ध कागदपत्रांनुसार या नावाच्या व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल २७ ऑक्टोबर रोजी पुढील दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबरला आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी कलेक्ट करण्यात आल्याचं म्हटलंय. या चाचण्यांमध्ये कोणालाच कोरोना संसर्ग झालेला नसल्याचंही या यादीत दाखवण्यात आलंय.
राज्येचे आरोग्य निर्देशक संजय कुमार सिंह यांनी दोन डेटा ऑप्रेटर्सला कामावरुन काढून टाकण्यात आलं असून या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती दिलीय. हा फसवणुकीचा प्रकार असून या नावांच्या आडून कोणाचे सॅम्पल गोळा करण्यात आलेले याचा तपास केला जाईल असं संजय यांनी म्हटलं आहे. डेटा ऑप्रेटर्सने या प्रकरणामध्ये आमच्यावर वरुन दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केलाय. मात्र वरिष्ठांनी हे आरोप फेटाळलेत.