जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात अटक झालेले सर्वच जण आमच्या जवळचे असल्याचं गिरीश महाजन यांनी मान्य केलं आहे. तसेच आता पुढे कायदेशीर कारवाई होत राहील, असंही महाजन म्हणाले.
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी आज १२ संशयितांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांचे समर्थक व भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या मेहुण्याचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये जामनेर येथील जितेंद्र पाटील, छगन झाल्टे आणि राजेश लोढा यांचा समावेश आहे. यातील जितेंद्र पाटील व छगन झाल्टे हे गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जातात. याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांचे नातेवाईक असलेले सुवर्ण व्यावसायिक भागवत भंगाळे यांनाही अटक झाली आहे. भंगाळे हे भोळे यांचे मेहुणे आहेत. ते जळगावातील प्रतिथयश व्यावसायिक मानले जातात. तर भुसावळातून अटक करण्यात आलेले आसिफ तेली हे देखील भाजप पदाधिकाऱ्याचे पुत्र आहेत.
‘अटक झालेल्यांपैकी सर्वच आमचे निकटवर्तीय आहेत. भागवत भंगाळे यांच्यापासून चंदू पटेल यांचंही नाव त्यात आहे. जामनेरचे दोघे ते तिघे आहेत. सर्वच जवळचे आहेत. दूरचं कुणीही नाही. ‘कर्जाची परतफेड केली आहे, असं या सर्वांचं म्हणणं आहे. आता पुढं कायदेशीर कारवाई होत राहील,’ असं महाजन यांनी म्हटलं आहे.
















