जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील अटकेतील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आज सर्वांची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे त्यांना पुणे शिवाजी नगर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेचा अव्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. तर महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, विवेक ठाकरे आणि कंडारेचा वाहन चालक कमलाकर कोळी असे एकूण पाच संशयित अटकेत आहेत. अटकेतील संशयितांची पोलीस कोठडी आज (रविवार) संपत असल्यामुळे त्यांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांकडून संशयितांची पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. परंतू न्यायालयाने सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.