जळगाव (प्रतिनिधी) ‘बीएचआर’ घोटाळ्याची चौकशी ‘ईओडब्ल्यू’नंतर इनकम टॅक्स विभाग देखील करण्याची शक्यता आहे. संशयित आरोपींच्या बेनामी संपत्तीची चौकशी ईडीकडून होणार असल्याचे कळते. दरम्यान, यानिमित्ताने ‘बीएचआर’ घोटाळ्याच्या चौकशी व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे.
बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवरचे नाशिकमध्ये बोरा नामक ठेकेदार व आणखी एका धान्य व्यापाऱ्यांशी कनेक्शन असून सातपूर-अंबड औद्योगिक क्षेत्रातही अनेक कंपन्या आणि बेनामी व्यवहार झाले असल्याची चर्चा आहे. याबाबत नाशिकच्या माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यानुसार नाशिकमधील धान्य व्यापारी व महापालिकेतील ठेकेदार बोरा या दोघांच्या माध्यमातून नाशिकमध्ये औद्योगिक वसाहती बरोबरच इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, गंगापूर, दरी, मातोरी आदी भागात अनेक मोठ्या फार्महाउसचे व्यवहार झाल्याच्या तक्रारी तपास यंत्रणेला मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, लवकरच भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) च्या सर्व मालमत्ता खरेदीचे व्यवहार तपासले जाणार आहेत. बीएच्या घोटाळ्याचे धागेदोरे नाशिक येथील वॉटर ग्रीसचा ठेका, मांजरपाडा आणि समृद्धी योजनेतील वाहन पुरवठ्याचा ठेक्याच्या दिशेने जात आहेत. तसेच नशिकमधील सातपूर-अंबडमध्ये अनेक बेनामी संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ‘बीएचआर’ घोटाळ्याची चौकशी ‘ईओडब्ल्यू’नंतर इनकम टॅक्स विभाग देखील करण्याची शक्यता आहे.