जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर प्रकरणात (Bhr Scam) जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी डेक्कन पोलिसात दाखल गुन्हा जळगाव पोलिसांकडे (Jalgaon Police) हस्तांतरित करण्यात आला आहे. दरम्यान, संपूर्ण घटनाक्रम चाळीसगाव शहरातील असल्यामुळे गुन्हा चाळीसगावला वर्ग झाला आहे. डेक्कन पोलिसांनी तत्कालीन माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan),विशेष लेखापरीक्षक शेखर सोनाळकर (रा. जळगाव) आणि चाळीसगावचे मद्यव्यापारी उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पुणे पोलिसांच्या तपासाचा सीआयडी चौकशी अहवाल गृहविभागाला सादर ?
डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांतील सर्व घटना या जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो अधिक तपासासाठी जळगाव पोलिसांकडे हस्तांतरित केला आहे. तर दुसरीकडे भाईचंद हिराचंद मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी (बीएचआर) मध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाबाबत सूरज झंवर यांनी राज्य गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यात अनेक गोष्टी पोलिसांनी अधिकाराच्या बाहेर जाऊन केल्याचे म्हटले होते. त्याचा तपास सीआयडीने केला होता. त्याचा अहवालही गृह विभागाला सादर केल्याचे कळते.
जाणून आतापर्यंत नेमकं काय घडलंय?
पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बीएचआरमधील गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १९ आरोपींना अटक केली होती. त्यात आरोपींच्या अटकेनुसार वेगवेगळ्या वेळी ४ पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर या सर्व १९ आरोपींची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच त्यातील ४ आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तर दुसरीकडे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे पोलिस अधिकाऱ्यांना दबावतंत्र वापरतात व आपल्या पदाचा गैरवापर करतात, याचा गौप्यस्फोट तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी बीएसआर प्रकरणात विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे बीएचआरच्या खटल्यात सरकारने नवीन विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली आहे.
चाळीसगाव पोलीस करणार तपास ; संशयितांना होऊ शकते अटक !
सुरज झंवर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार खंडणी चाळीसगाव शहरातील उदय पवार यांच्या घरात स्वीकारली गेली आहे. थोडक्यात गुन्हा चाळीसगावच्या हद्दीत घडला आहे. त्यामुळे चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा वर्ग झाला आहे. तर हा गुन्हा एलसीबी, अपर पोलीस अधीक्षक किंवा डीवायएसपींकडेही तपासाला दिला जाऊ शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस अधीक्षकच घेतील. तर दुसरीकडे या गुन्ह्यात खंडणीसह १२० ब अर्थात संगणमताने कटरचणे सारखे गंभीर कलमे लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे संशयितांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.
जाणून घ्या….सुरज झंवर यांनी फिर्यादीत मांडलेला चाळीसगावातील संपूर्ण घटनाक्रम !
सुरज झंवर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांनी उदय पवार मार्फत दिलेल्या धमकी नुसार व्यवसायातील रक्कम रुपये पाचशे व दोन हजार रुपयेच्या चलनी नोटा घेवून एकूण १ कोटी २२ लाख रुपये घेवुन उदय पवार यांच्याकडे दि. 26 नोव्हेंबर रोजी चाळीसगाव येथे गेले होते. ओरीजनल वाईन शॉप येथे पोहोचल्यावर सुरज झंवर यांनी उदय पवार यांना फोन केला. त्यानंतर ते तेथे त्यांचेकडील बुलेट गाड़ी घेवुन आले व त्यांच्या मोटार सायकलचे मागे मागे येत राहावे, अशी सूचना केली.
एक कोटी जमा झाल्याचे सांगितले सांकेतीक भाषेत
उदय पवार मोटार सायकलच्या पाठीमागे कार चालवत सुरज झंवर त्यांच्या घरी पोहोचलो. तेव्हा उदय पवार यांनी विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांचे सांगण्यावरुन १ कोटी रोख व स्वतःसाठी २० लाख रुपये रोख व हवाल्याचे दोन लाख रुपये रोख असे एकुण एक कोटी बावीस लाख रुपये माझेकडून रोख स्वरुपात घेतल्याचे सुरज झंवर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पैसे घेतल्यानंतर व ते मोजल्यानंतर उदय पवार यांनी विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांना सिंगल अँपवरुन “एक फाईल (1 कोटी रुपये) जमा झाली आहे”. असे सांकेतीक भाषेत सांगितले.
सिग्रल अॅपवरुन संवाद !
उदय पवार यांच्या सिंग्नल अँपवरुन विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण यांना आता तरी माझ्या वडीलांना जेलमधुन सोडण्यासाठी व आमची गोठवलेली बँक खाती मुक्त करण्यासाठी मदत करा. मी तुमची मागणी पुर्ण केली आहे, अशी विनंती सुरज झंवर यांनी केली. त्यावेळी उदय पवार याने सिग्रल अॅपवरुन अॅड. प्रविण चव्हाण यांना संपर्क केला व सुरज यांचे बोलणे करुन दिले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की, तु आम्ही सांगितल्याप्रमाणे एक फाईल (1 कोटी रुपये) दिली आहेस, चिंता करु नको. जी मदत गिरीष महाजन करु शकले नाहीत ती आम्ही करु. मी व शेखर सोनाळकर तुझे सर्व काम करुन देतो, असे सांगितले. तेव्हा शेखर सोनाळकर हा देखील संभाषणात सहभागी होता, असे सुरज झंवर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.